ICC World Test Championship : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका खूप खास आहे. कारण या मालिकेतून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध कोणता संघ खेळणार हे कळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा निकाल या दोन संघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे भवितव्य निश्चित करेल.


चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील शर्यत आणखीन रंजक बनली आहे. चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडचे आता 70.2 टक्के गुण झाले आहेत आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारत पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.


अशा प्रकारे भारत होऊ शकतो क्वालिफाय


इंग्लंडविरुद्धची पहिला कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने गमावला आहे. पण तरीही भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळू शकेल. जर इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका भारत 2-1 किंवा 3-1 ने जिंकली तर भारताचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकीट पक्क असेल.


एक पराभव आणि भारत बाहेर


इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताने एकच सामना गमावल्यास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल. याचाच अर्थ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित तीन कसोटी सामन्यांपैकी कमीतकमी दोन कसोटी सामने जिंकून आणि एक ड्रॉ करावा लागणार आहे.


... तर इंग्लंडला अंतिम तिकीट मिळेल


दुसरीकडे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जायचे असेल तर त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 3-0, 3-1 किंवा 4-0 अशी जिंकावी लागणार आहे. म्हणजे इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले पाहिजेत.


मालिका ड्रॉ झाल्यास ऑस्ट्रेलिया पात्र ठरेल


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी भारत आणि इंग्लंड मालिकेवर ऑस्ट्रेलियाचंही लक्ष आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 किंवा 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचेल.