IND vs ENG : हिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत विजय मिळवला आहे. इंग्लंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, या पराभवासाठी आमच्याकडे कोणतंच कारण नाही. तसेच पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, माझ्याकडे एक असा संघ आहे जो आपल्या पराभवाचा स्विकार करतो आणि पराभवातून शिकतो.
चेन्नई कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, "कोणतंच कारण नाही. आम्ही एक अशी टीम आहोत, जी आपला पराभव मान्य करते आणि त्यातून शिकते. एक गोष्ट तर ठरलेली आहे की, आता पुढील तीन सामने आणखी आव्हानात्मक असणार आहेत. ते आम्हाला अशाप्रकारे गमावता येणार नाहीत. त्यामुळे पढील सामन्यांसाठी आम्हाला खेळपट्टीचा अभ्यास करावा लागेल आणि गोलंदाज काय करणार आहेत, हे देखील जाणून घ्यावं लागेल. आम्हाला माहित आहे की, कसं वापसी करायची आहे. पुढील सामन्यांमध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरु आणि पूर्ण प्रयत्न करु"
विराट बोलताना म्हणाला की, "विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी आपल्या गोलंदाजी युनिटची आवश्यकता आहे. परंतु, आम्हाला ते या सामन्यात शक्य झालं नाही. आम्ही आमची धोरणे नीट अंमलात आणू शकलो नाही. परंतु आपल्यासाठी योग्य मानसिकता असणे महत्वाचे आहे."
कर्णधार विराट कोहली बोलताना म्हणाला की, "या सामन्यात संघाची देहबोली ठीक नव्हती आणि त्याचवेळी संघ आक्रमकताही दाखवू शकला नाही." पुढे बोलताना कोहली म्हणाला की, "आपली देहबोली ठीक नव्हती आणि आक्रमकतेचाही अभाव होता. दुसऱ्या डावात आम्ही काही प्रमाणात व्यवस्थित होतो. सुरुवातीचे चार फलंदाज वगळता आम्ही पहिल्या डावाच्या दुसऱ्या भागांत व्यवस्थित खेळलो. फलंदाजीत आम्ही पहिल्या डावात व्यवस्थित खेळलो. पण आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तसेच लवकरात लवकर यामध्ये सुधारणा कराव्या लागतील."
पहिल्या दिवसापासून इंग्लंंडची सामन्यावर पकड
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा संघ 337 धावांवर आटोपला. भारताकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी भारताचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- IND vs ENG | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा कसोटीत सलग चौथा पराभव, पाहा धक्कादायक आकडे
- IND vs ENG 1st Test: 36 वर्षांनी चेन्नईत इंग्लंडकडून टीम इंडिया पराभूत
- INDvsENG 1st Test : अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' विक्रम करणारा 100 वर्षातील एकमेव फिरकीपटू
- INDvsENG 1st test: टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव, इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी