ICC T20 Rankings : टी20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झाली असून नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं (ICC) टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाज, गोलंदाजांसह अष्टपैलू खेळाडूंची रँकिंग समोर आली असून अष्टपैलू रँकिंगमध्ये बांग्लादेशच्या शाकीब अल् हसनने (shakib al Hasan) पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. भारताचा विचार करता स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुसऱ्या स्थानी कायम असून विश्वचषकानंतर तो नक्कीच पहिलं स्थान मिळवू शकतो. पहिल्या स्थानाचा विचार करता पाकिस्तानता मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) नंबर 1 वर असून गोलंदाजांमध्ये जोश हेझलवुड विराजमान आहे. 


बांग्लादेशने नुकत्याच खेळलेल्या काही सामन्यांमध्ये अनुभवी खेळाडू शाकीबने सलग अर्धशतकं ठोकत न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेत कमाल कामगिरी करत आपलं अव्वल स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलियातील बांग्लादेशच्या T20 विश्वचषकाच्या मोहिमेपूर्वी शाकीबचा हा फॉर्म संघाला नक्कीच फायदेशीर ठरेल. याशिवाय नवखा संघ नामिबियाचा स्टार जेजे स्मिटला चार स्थानांचा फायदा झाला असून तो चौथ्या स्थानावर आला आहे. तर झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझाला चार स्थानांचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर आला आहे. 




फलंदाजीत रिझवान अव्वल


फलंदाजीच्या रँकिंगचा विचार करता पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिझवानच्या खात्यावर 861 गुण असल्यामुळे तो अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यानेही न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेदरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी करून T20I फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आपली आघाडी आणखी वाढवली. त्याच्यानंतर भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव 838 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून कर्णधार बाबर आझम 808 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.  


गोलंदाजीत हेझलवुड पहिल्या स्थानावर


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड 705 गुणांसह T20I गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आपली आघाडी कायम ठेवून आहे. तर अफगाणिस्तानचा राशिद खान (696), श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा (692) आणि दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी तबरेझ शम्सी (688) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.


हे देखील वाचा-


T20 World Cup 2022 : इंग्लंड संघाला मोठा झटका, स्टार खेळाडू रीस टोपले विश्वचषक स्पर्धेबाहेर