ICC T-20 World Cup 2024: आयपीएल 2024 हंगामानंतर लगेचच 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याचदरम्यान वेस्ट इंडिजला टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.


वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी उत्तर पाकिस्तानकडून मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रो इस्लामिक स्टेट (IS) ने क्रीडा स्पर्धांदरम्यान हल्ले करण्याची योजना आखली आहे. आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबद्दल बोलले आहे आणि समर्थकांना यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.






ICC आणि CWI ने सुरक्षेचे दिले आश्वासन-


T20 विश्वचषकाचे सह-यजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यात सुरक्षाविषयक चिंता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. टी-20 विश्वचषकात सामील असलेल्या सर्वांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहेत, असं जॉनी ग्रेव्हज यांनी आश्वासन दिलं.


परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून-


कॅरिबियन मीडियाने त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रॉली यांचा हवाला देत म्हटले आहे की, सामना पाहता कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. रिपोर्टनुसार, प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशीर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी मिळाली आहे.


वेस्ट इंडिजमध्ये अनेक ठिकाणी सामने होणार-


जूनपासून वेस्ट इंडिजमध्ये अनेक ठिकाणी टी-20 विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. बार्बाडोस, गयाना, अँटिग्वा आणि बारबुडा, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसिया, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो या जागतिक स्पर्धेचे सामने आयोजित करणार आहेत.


टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल-


आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.


विश्वचषकाचा गट असा असेल -


अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video