ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषकाची सुरुवात पुढील महिन्यात 2 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 संघ सहभागी होत असून त्यांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागण्यात आले आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते. यावेळी अमेरिका व्यतिरिक्त वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, युगांडा आणि कॅनडाचे संघही दिसणार आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत.


विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, डेव्हिड मिलर, केन विल्यमसन, जोस बटलर, वानिंदू हसरंगा, आंद्रे रसेल, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र या खेळाडूंव्यतिरिक्त विश्वचषकाच्या स्पर्धेत नवीन संघांचे काही खेळाडू त्यांच्या कामगिरीने चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकतात. यामध्ये यूएईचा कार्तिक मयप्पन, युगांडाचा फिरकी गोलंदाज फ्रँक नुबुगा, कॅनडाचा पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज साद बिन जफर, नेपाळचा कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग एरी यांचा समावेश आहे. 


कोणाच्या नावावर कोणता विक्रम?


यूएईचा कार्तिक मयप्पनने 2022 च्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. तसेच टी-20 मध्ये सर्वाधिक 15 निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम सुबुगाच्या नावावर आहे . नेपाळच्या कुशल मल्लाने टी-20 मध्ये अवघ्या 34 चेंडूत शतक झळकावले आहे, तर दीपेंद्र ऐरीच्या नावावर एका षटकात 6 षटकार मारण्याचा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत (9 चेंडू) अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही दीपेंद्र सिंह ऐरीने नोंदवला आहे. 


दोनदा 6 चेंडूत टोलावलेत 6 षटकार-


कतारविरुद्धच्या या खेळीदरम्यान दीपेंद्रने दुसऱ्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 6 चेंडूत सलग 6 षटकार ठोकण्याच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. दीपेंद्रने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये मंगोलियाविरुद्धच्या सामन्यातही सलग 6 चेंडूत (एका षटकात नाही) षटकार मारले होते. दोन षटकात लागोपाठ 6 चेंडूत त्याचे सहा षटकार आले. इतकंच नाही तर हांगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळीदरम्यान त्याने सर्वात कमी चेंडूंवर अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही केला. अवघ्या 9 चेंडूत 50 धावा पूर्ण करत त्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा युवराज सिंगचा विक्रम मोडला.


टी-20 मध्ये सर्वोच्च स्ट्राइक रेट-


दीपेंद्र सिंगच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. 27 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने 10 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 52 धावांची नाबाद खेळी खेळली. या कालावधीत, त्याचा स्ट्राइक रेट 520.00 होता, जो आत्तापर्यंतचा T20I मधील सर्वोच्च आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा हॅरी ब्रूक आहे, ज्याने डिसेंबर 2023 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध सेंट जॉर्ज टी-20मध्ये 442.85 च्या स्ट्राइक रेटने सात चेंडूंवर नाबाद 31 धावा (चार षटकार आणि एक चौकार) केल्या होत्या.


संबंधित बातम्या:


किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार


IPL 2024: संत्र्याची तुलना सफरचंदाशी करु नको...; गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर संतापला, हार्दिक पांड्यासाठी मैदानात उतरला!