Cricket news | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही स्वरूपात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार म्हणजेच 'सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ द डिकेड'ने गौरव केला आहे.
आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकाही ठोकले आहेत. या दशकात कोहलीच्या फलंदाजीमध्ये 20,396 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 66 शतके आणि 94 अर्धशतकांचा समावेश होता.
यापूर्वी आयसीसीने कोहलीची निवड दशकातील सर्वश्रेष्ठ वनडे क्रिकेटपटू म्हणून केली होती. या दशकात, कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. तर रविवारी आयसीसीने विराट कोहलीला या दशकाच्या तिन्ही फॉर्मेटच्या संघात स्थान दिले. त्याशिवाय आयसीसीने कोहलीला या दशकातील कसोटी संघाचा कर्णधारही बनवले.
आयसीसीचा दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर
रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) ने या दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर केला असून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली तर एकदिवसीय आणि टी 20 संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीची निवड केलीय. यांच्या व्यतिरिक्त आर. अश्विन, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांचाही समावेश या संघात करण्यात आला आहे. विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्याला क्रिकेटच्या तिन्ही संघात स्थान मिळालंय. रविवारी आयसीसीनं या संघाची घोषणा केलीय.