ODI Rankings : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरले. टीम इंडियाने पाकिस्तानला अवघ्या ५० धावांत तंबूत धाडले. सिराजच्या भेदक माऱ्यामुळे भारताने दहा विकेटने विजय मिळवला. पण विजयानंतरही भारतीय संघाला रँकिंगमध्ये हवा तितका फायदा झाला नाही. आयसीसीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहचलाय.  


आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीत तळाला राहणारा पाकिस्तान संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचलाय. दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयाचा फायदा पाकिस्तान संघाला झालाय. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने १२२ धावांनी विजय नोंदवला. या दारुण पराभवामुळे पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय. भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान अव्वल स्थानावर आहे. 


भारत दुसऱ्या क्रमांकावर, असा होईल नंबर एक


आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे रेटिंग 114.659 आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाचे रेटिंग 114.889 आहे.आशिय चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. २२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या मालिकेत भारताने विजय मिळवला तर वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावू शकेल. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलिया संघही अव्वल स्थान पटकावू शकतो. 


इतर संघाची स्थिती -
पाकिस्तान पहिल्या, भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका 106 रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंड 105 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.


कसोटी आणि टी20 मध्ये टीम इंडिया अव्वल - 


वनडेमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  पण कसोटी आणि टी२० मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानवर विराजमान आहे.  टीम इंडियाला टेस्टमध्ये 118 तर टी-20 मध्ये 264 रेटिंग आहे.














आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदूर आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.