IND vs BAN : दोन जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाच जून रोजी आर्यलँडविरोधात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ सराव सामन्यासाठी मैदानात उतरलाय. बांगलादेशविरोधात सराव सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारलाय. 


ऋषभ पंतचे वादळी अर्धशतक - 


ऋषभ पंत याने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिटाई केली. पंत याने अवघ्या 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. पंत याने आपल्य या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि चार चौकर ठोकले. पंतने 166 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. 


हार्दिक पांड्याची फटकेबाजी - 


अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली. पांड्याने 23 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पांड्याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. पांड्याने वादळी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. त्याने 174 च्या स्ट्राईक रेटने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. पांड्याने लागोपाठ तीन षटकार ठोकत आपण फॉर्मत परतल्याची हिंट दिली. त्याशिवाय गोलंदाजीमध्येही पांड्याने भेदक मारा करत विकेट घेतली.


दुबे-संजू फ्लॉप - 


संजू सॅमसन याला सलामीला संधी दिली होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन फक्त एक धाव काढून बाद झाला. त्यासाठी त्याने सहा चेंडू खर्च केले. 


शिवम दुबे यालाही मोठी खेळी करता आली नाही. आयपीएलमध्ये फटकेबाजी करणारा दुबे सराव सामन्यात फेल ठरला. दुबे याला फक्त 14 धावांची खेळी करता आली. त्यासाठी त्याने 16 चेंडू खेळले. शिवम दुबे याने आपल्या खेळीत एक षटकार ठोकला. 


सूर्यायाला चांगली सुरुवात, पण.... 


कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना सराव सामन्यात चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित शर्माने 19 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने एक षटकार ठोकला, त्याशिवाय दोन चौकारही लगावले. 


सूर्यकुमार यादव यालाही चांगली सुरुवात मिळाली होती. त्याने आक्रमक सुरुवात केली, पण त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. सूर्यकुमार यादव याने 18 चेंडूमध्ये चार चौकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. रविंद्र जाडेजा चार धावांवर नाबाद राहिला. 


शरीफुल इस्लाम, महमुदुल्ला, मेहंदी हसन आणि तनवीर इस्लाम यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.