T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केलीय. दरम्यान, मॅच रेफरी (Match Referees) आणि अंपायरसह (Umpires) एकूण 20 अधिकार्यांची निवड करण्यात आलीय. ज्यात 16 अंपायर आणि चार मॅच रेफरी यांचा समावेश आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या यादीत नितीन मेनन (Nitin Menon) हे भारतातील एकमेव अंपायर आहेत. नितीन मेनन हे आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत, जे टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.
आयसीसीनं टी-20 विश्वचषकाच्या पहिला टप्पा आणि सुपर-12 फेरीसाठी एकूण 20 सामना अधिकाऱ्यांची घोषणा केलीय. "एकूण 16 जण या स्पर्धेत पंचाची भूमिका बजावतील. ज्यात रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, कुमारा धर्मसेना आणि मरायस इरास्मस यांचा समावेश आहे. दरम्यान, 2021च्या अंतिम सामन्यात सामन्यातही ते अंपायर होते, जो सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता", असं आयसीसीनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
मॅच रेफरीच्या भूमिकेत कोण?
आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रंजन मदुगले टी-20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीसाठी सामनाधिकारी असतील. श्रीलंकेचा मदुगले यांच्यासह झिम्बाब्वेचा अँड्र्यू पायक्रॉफ्ट, इंग्लंडचा ख्रिस्तोफर ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून हेही या मेगा स्पर्धेत मॅच रेफरीच्या भूमिकेत दिसतील.
मॅच रेफरी:
एंड्रयू पाइक्रॉफ्ट, क्रिस्टोफर ब्रॉड, डेविड बून आणि रंजन मदुगले.
अंपायर:
एड्रियन होल्डस्टॉक, अलीम डार, अहसान रजा, क्रिस्टोफर ब्राउन, क्रिस्टोफर गफानी, जोएल विल्सन, कुमारा धर्मसेना, लँग्टन रुसेरे , मरॅस इरास्मस, माइकल गफ, नितिन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, रॉडनी टकर.
ऑस्ट्रेलियाच्या या शहरात रंगणार टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-