ICC Awards : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ICC Spirit of Cricket of the decade पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्करासाठी एकूण धोनीसह एकूण 7 जणांना नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारावर धोनीने आपलं नाव कोरलं आहे.


टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2011 मध्ये नॉटिंघममध्ये सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इयन मॉर्गन आणि इयन बेल खेळत होते. यावेळी इयन बेलला रनआऊट करण्यात आलं होतं. थर्ड अंपाअरने बेलला आऊट घोषित केलं आणि लगेचच टी टाईम झाला. टी टाईम नंतर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला. तेव्हा मॉर्गनसह बेलही मैदानात आला. मात्र बेल गैरसमजामुळे बाद झाला, हे धोनीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे धोनीने कर्णधार या नात्याने बेलला फलंदाजीसाठी बोलावलं. धोनीच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुकही करण्यात आलं. तसेच धोनीला त्याच्या या खेळाडूवृत्तीचं बक्षिस मिळालं.





ICC Player of the Decade: विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, ICC कडून गौरव

धोनीसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार जाहीर केला आहे. विराटला एकूण 5 पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आलं होतं. त्यापैकी विराटला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मान मिळाला आहे.  या दशकात तिन्ही स्वरूपात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार म्हणजेच 'सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ द डेकेड'ने गौरव केला आहे.


आयसीसीचा दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर


रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) ने या दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर केला असून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली तर एकदिवसीय आणि टी 20 संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीची निवड केलीय. यांच्या व्यतिरिक्त आर. अश्विन, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांचाही समावेश या संघात करण्यात आला आहे. विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्याला क्रिकेटच्या तिन्ही संघात स्थान मिळालंय. रविवारी आयसीसीनं या संघाची घोषणा केलीय.