ICC: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर, भारताच्या सहभागावर निर्णय होणार?
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेसंदर्भात लवकरच एक बैठक होण्याची शक्यता आहे.
ICC Delegation to Visit Pakistan Champions Trophy 2025 नवी दिल्ली: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. फेब्रुवारी- मार्च महि्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे. आयसीसीची एक टीम 10-12 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. याशिवाय पाकिस्तानी मीडिया चॅनेलच्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक सहभागी होणाऱ्या देशांना पाठवण्यात आलं आहे. आयसीसीच्या टीमकडून स्पर्धेसाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थेचा देखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 11 नोव्हेंबरला चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात एक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये क्रिकेटपटू आणि मोठे अधिकारी सरभागी होण्याचा अंदाज आहे. या कार्यक्रमानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात आयसीसीच्या काही अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केलाहोता. एका बाजूला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे भारतानं अजूनही पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार की नाही या बाबत निर्णय घेतला नाही.
पाकिस्तानकडून आयसीसीला पाठवण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पार पडणार आहे. 10 मार्चचा दिवस राखीव असेल. ही स्पर्धा कराची, रावळपिंडी आणि लाहोर या मैदानात खेळवली जाणार आहे. फायनलसह 7 मॅच लाहोरमध्ये खेळवल्या जाणार आहेत. कराचीमध्ये दोन्ही ग्रुपच्या पहिल्या मॅच आणि एक सेमीफायनल खेळवली जाईल. दुसरी सेमी फायनल रावळपिंडीत होईल. त्या मैदानात 5 सामने होणार आहेत.
संभाव्य वेळापत्रकानुसार भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवल्या जाणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे ग्रुप एमध्ये आहेत. भारताची पहिली मॅच 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 23 फेब्रुवारीला आणि 1 मार्चला पाकिस्तान विरुद्ध मॅच होणार आहे. मात्र, टीम इंडिया पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यास जाणार की नाही याचा निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी न झाल्यास श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या आठ स्थानावर असलेल्या संघांना प्रवेश मिळाला आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यास ते स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात. अशा परिस्थितीत श्रीलंकेला संधी मिळेल. भारताच्या मागणीवरुन हायब्रीड मॉडेलचा वापर केला जाणार का हे देखील पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या :