Deepak Chahar Compares himself to All-Rounder Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑल-राउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने नुकतच संघात पुनरागमन केलं आहे. पांड्या दुखापतीमुळे खेळातून बाहेर होता. हार्दिक पांड्याकडे एक ऑल-राऊंडर खेळाडू (All-Rounder Player) म्हणून पाहिलं जातं. दुखापतीनंतर संघात परत येताच पांड्याच्या खेळातही काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्याचा फॉर्म पहिल्यापेक्षा चांगला आहे. पांड्याकडे टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणूनही पाहिलं जातं. सध्या हार्दिक पांड्याकडे टी20 संघाचं नेतृत्व आहे. पण वनडेसाठीही तो एक उत्तम खेळाडू आहे. हार्दिक पांड्या वगळता भारताकडे असा अष्टपैलू खेळाडू नाही जो सर्व तिन्ही फॉर्ममध्ये चांगलं खेळू शकतो. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने स्वत:ची तुलना हार्दिक पांड्यासोबत केली आहे.


''हार्दिक पांड्याप्रमाणे ऑलराऊंडर खेळाडू''


''मी हार्दिक पांड्याप्रमाणे ऑलराऊंडर खेळाडू असून माझी बॉलिंगसह बॅटींगही उत्तम'' असल्याचं क्रिकेटपटू दीपक चहरने (Deepak Chahar) म्हटलं आहे. दुखापतीमुळे अनेक दिवस मैदानापासून लांब असलेल्या दीपक चहरने स्वत:ची तुलना हार्दिक पांड्यासोबत केली आहे. हार्दिक पांड्याप्रमाणे ऑल-राऊंडर खेळाडूची निवड करण्यावर निवड अधिकाऱ्यांचा भर असेल. दीपक चहरला वाटतंय की तो हार्दिकच्या खेळाशी बरोबरी करु शकतो.


'या' खेळाडूने केली स्वत:ची पांड्याशी तुलना


दीपक चहर यानं म्हटलं आहे की, ''मी 140 किमी वेगाने गोलंदाजी करु शकतो, बॉल स्विंग करु शकतो आणि अलिकडे माझ्या फलंदाजीमध्येही चांगली सुधारणा झाली आहे.'' चहरने त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याबाबत म्हटलं आहे की, ''स्पर्धा खूप खडतर आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करावं लागेल. मी लहान असल्यापासून फलंदाजी हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. गेल्या वर्षी मला संधी मिळाल्याने मला धावाही करता आल्या.''


हार्दिक पांड्या जगातील पहिल्या नंबरचा अष्टपैलू खेळाडू


हार्दिक पांड्याशी स्वत:ची तुलना करताना दीपक चहर पुढे म्हणाला की, ''हार्दिक पांड्याकडे पाहा, तो तिन्ही गोष्टी करतो वेगवान गोलंदाजी, स्विंग आणि फलंदाजी. भारतीय संघात आता किमान एक किंवा दोन वर्षे इतर कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. तो जगातील पहिल्या नंबरचा अष्टपैलू खेळाडू आहे कारण तो तिन्ही करू शकतो. असा विचार करणारा मी एकटा नाही, जर एखाद्या खेळाडूने हे केले तर त्यालाही संघात स्थान मिळेल.''