Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्स टूर्नामेंटमध्ये पराभवाने मोहिमेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला पूल सीच्या दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE विरुद्ध 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे टीम इंडियाचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. प्रथम फलंदाजी करताना UAE ने 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 6 षटकांत 4 गडी गमावून केवळ 129 धावा करू शकला. अशाप्रकारे भारताला या स्पर्धेत पाकिस्ताननंतर UAE ने ही लोळवलं.
UAE कडून खालिद शाहने 10 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी खेळली. तर जहूर खानने 11 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 3 बळी घेतले. भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी स्टुअर्ट बिन्नीने केली, ज्याने 3 बळी घेण्याव्यतिरिक्त 11 चेंडूत 44 धावांची खेळी केली. कर्णधार रॉबिन उथप्पाने 10 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 43 धावा केल्या. भारताला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती पण स्टुअर्ट बिन्नी धावबाद झाला आणि संघाचा सामना 1 धावांनी गमवावा लागला.
गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला 1 नोव्हेंबर रोजी हाँगकाँग सिक्स क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भरत चिपली दुखापतग्रस्त झाला पण पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने 16 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे भारताला निर्धारित 6 षटकांत 119 धावा करता आल्या. भारतीय कर्णधार रॉबिन उथप्पानेही 8 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. मात्र भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवत 120 धावांचे लक्ष्य गाठले.
हे ही वाचा -