Heath Streak Cancer : झिम्बाब्वे (Zimbabwe) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक (Heath Streak) हा मृत्युशी झुंज देत आहे. 49 वर्षीय हीथ स्ट्रीकला यकृताचा कर्करोग झाला असून तो चौथ्या टप्प्यात पोहोचला असल्याचं कळतं. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असून तो सध्या जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे.  त्याचे कुटुंब लंडनहून त्याच्याजवळ पोहोचले आहे. हीथ स्ट्रीकला कर्करोगाने ग्रासल्याचं वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.


'एखादा चमत्कारच त्याचे आयुष्य वाचवू शकतो'


झिम्बाब्वेच्या क्रीडामंत्र्यांनी ट्वीट करत म्हटले की, "हिथ स्ट्रीक त्याच्या आयुष्याचे अखेरच्या घटका मोजत आहे. तसेच त्याचे कुटुंब लंडनवरुन दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहे. पण आता एखादा चमत्कारच त्याचे आयुष्य वाचवू शकतो."


कुटुंबाने दिला विश्वास 


वृत्तानुसार, त्याच्या कुटुंबाने त्याच्या प्रकृतीबद्दल गोपनीयता बाळगण्याची विनंती केली आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी म्हटले की, "हीथला कॅन्सर आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील एक प्रतिष्ठित ऑन्कोलॉजिस्ट त्याच्यावर उपचार करत आहेत. तसेच त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा त्याला यातून नक्कीच बाहेर काढेल. जसा तो मैदानावर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत होता तसाच आता या आजाराशी देखील लढेल."


'हीथ माझा गुरु आहे'


झिम्बाब्वेचा सध्याचा क्रिकेटपटू आणि त्याचा जवळचा मित्र असलेल्या सीन विल्यम्सने त्याच्या प्रकृतीबद्दल सांगताना म्हटले की, "हीथला यकृताचा कर्करोग असून तो आजार शेवटच्या टप्प्यावर आहे." पुढे बोलताना त्याने म्हटल की, "हीथच्या  कुटुंबाला त्याच्याजवळ बोलावण्यात आले आहे आणि मला त्याबाबतच्या कोणत्याही गोष्टीबद्दल फारशी माहिती नाही. मी हीथला मेसेज केला आणि त्यानेही मला मेसेज केला आहे. पण मला खात्री आहे की या टप्प्यावर कुटुंबाला एकांत हवा आहे." विल्यम्सने शनिवारी रात्री एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. पुढे बोलताना त्याने म्हटले की, "हीथ माझा गुरु आहे आणि त्याने बर्‍याच लोकांसाठी खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मुळात त्याने माझे आयुष्य आणि करिअर वाचवले आहे. आता आम्ही फक्त प्रार्थना करत आहोत की तो लवकर बरा कसा होईल."


आठ वर्षांचं निलंबन 


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंमध्ये 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा स्ट्रीक हा पहिला क्रिकेटपटू आहे. तसेच निवृत्तीनंतर भ्रष्टाचार प्रकरणामुळे तो अडचणीत आला होता आणि 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घातली होतं.


एकदिवसीय सामन्यांमध्ये स्ट्रीकने 2943 धावा केल्या आहेत. तर 239 विकेट्स घेतल्या आहेत. निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएल मधील गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांसाठी काम केले आहे. स्ट्रीकने आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. 


स्ट्रीक हा झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने 1993 ते 2005 पर्यंत एकूण 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत.