Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. आयपीएलच्या वेळेपासूनच दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, घटस्फोटाच्या पोस्टमध्ये दोघांनीही आपल्या मुलाच्या अगस्त्याचे सहपालक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


अगस्त्यचा आज वाढदिवस-


हार्दिक पांड्या आणि नताशाचा मुलगा अगस्त्य याचा आज वाढदिवस आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो आपल्या मुलासोबत मस्ती करत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले की, तु मला दररोज पुढे जाण्याची प्रेरणा देतो. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांमधून व्यक्त करता येणार नाही, असंही हार्दिक पांड्या पोस्टद्वारे म्हणाला. 






नताशा अगस्त्यसोबत सर्बियामध्ये-


हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची घोषणा होण्याच्या एक दिवस अगोदर नताशा तिच्या देशात सर्बियाला गेली होती. अगस्त्य आणि ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. काही दिवसांपूर्वी नताशा आपल्या मुलासोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी तिने अगस्त्यचे काही फोटो शेअर केले होते. त्यावर हार्दिक पांड्यानेही प्रतिक्रियाही दिली होती.


चार वर्षांचा संसार मोडला-


हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.


हार्दिक पांड्याने टी-20 विश्वचषकात दाखवली आपली ताकद...


अलीकडेच भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे महत्त्वाचे योगदान होते. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही या खेळाडूने आपली ताकद दाखवली. विशेषत: हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने सामन्याचे चित्र बदलून टाकले.


हार्दिक पांड्याची वन-डे मालिकेतून माघार-


हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. आज दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. 2 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्याने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयमधून वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळेच हार्दिक पांड्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार नाही.


संबंधित बातमी:


रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल