Happy Birthday R Ashwin: भारताचा स्टार फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आज त्याच्या 36वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनचा जन्म आजच्या दिवशी 36 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 सप्टेंबर 1986 मध्ये झाला. त्यानं आपलं शालेय शिक्षण शेषाद्री बाला भवन आणि सेंट बेडे मधून झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी एसएसएन महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला अश्विनला फुटबॉलची आवड होती. परंतु, त्याच्या नशीबात क्रिकेटर होणंच लिहलं होतं. अश्विननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. जगभरातील दिग्गज फिरकी गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं रचलेल्या काही खास विक्रमांवर एक नजर टाकुयात.


भारताच्या स्टार ऑलराऊंडरच्या यादीत अश्विनचा समावेश आहे. त्यानं फक्त गोलंदाजीच नाही तर, फलंदाजीतही उत्तम प्रदर्शन करून दाखवलंय. कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विननं अनेक सामन्यात खालच्या फळीत फलंदाजी करत भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. अश्विन हा सुरुवातीच्या काळात कॅरम बॉलसाठी प्रसिद्ध होता. त्यानं 2019 मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 


पदापर्णाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला
अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना 6 नोव्हेंबर 2011 मध्ये आस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. एडिलेड येथे खेळण्यात आलेला सामना अश्विनसाठी खूप खास ठरला. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात अश्विननं 9 विकेट्स घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात त्याला सामानावीर म्हणून गौरवण्यात आलं. पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणार तो चौथा भारतीय खेळाडू आहे. अश्विन पूर्वी नरेंद्र हिरवाणी, प्रवीण आमरे आणि आरपी सिंह यांनी पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. 


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये अश्विननं अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. त्यापैकी एक म्हणजे, त्यानं 54 व्या कसोटी सामन्यात 300 विकेट्सचा टप्पा गाठला होता. त्यानं 18 व्या कसोटी सामन्यातच 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. अश्विनपूर्वी इरापल्ली प्रसन्नाच्या नावावर सर्वात जलद 100 कसोटी विकेट्स घेण्याची नोंद होती. त्यानं 20 कसोटीत 100 विकेट्सचा टप्पा गाठला होता. 


सहा वेळा मालिकावीराचा पुरस्कार
अश्विननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत सहा वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय. याबाबतीत त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचाही विक्रम मोडलाय. सचिन आणि सेहवागनं त्यांच्या कसोटी कारकिर्दीत पाच वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय. 


आर अश्विनची कारकिर्द
अश्विननं 79 कसोटी, 111 एकदिवसीय आणि 46 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 413, 150 आणि 52 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विननं पाच शतकासह एकूण 2 हजार 685 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-