मुंबई : वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-20 च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने (Team India) विश्वचषक उंचावला. प्रशिक्षक राहुल द्रविडचं मार्गदर्शन आणि कर्णधार रोहित शर्माची रणनिती एकत्र आल्याने भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न तब्बल 17 वर्षांनी पूर्ण झालं. या विजयानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून आपली निवृत्ता जाहीर केली, तर राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) माईलस्टोन गाठल्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगत निवृत्ती घेतली. त्यामुळे, आता नव्या दमातील टीम इंडियाची धुरा कोणाकडे जाणार यावरुन तर्क वितर्क लावले जात होते. त्यामध्ये, टीम इंडियाचा माजी आक्रमक फलंदाज गौतम गंभीर आघाडीवर होता. अखेर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या भविष्याबाबत गंभीरतेने विचार करुन गौतम गंभीरची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. त्यामुळे, टीम इंडियात टशन, खुन्नस आणि आरेला कारे.. अशी आक्रमक शैली दाखवलेल्या गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) नव्या दमाच्या टीमला घडवण्याची जबाबदारी आली आहे.


भारतीय संघाने 2011 मध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वचषक उंचावला. या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीचे आणि टीम इंडियाचे कौतुक झाले, पण अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा गौतम गंभीर दुर्लक्षित राहिला. मात्र, गौतम गंभीर गंभीरची क्रिकेट कारकीर्द त्याच्या उत्कृष्ट, आक्रमक खेळीमुळे जेवढी गाजली, तेवढीच त्याची कारकीर्द मैदानात घेतलेल्या आक्रमक शैलीमुळे, विरोधी संघातील खेळाडूंना दिलेल्या टशन आणि खुन्नसमुळे गाजली. विरोधी संघाच्याच सोडा पण, भारतीय खेळाडूंसोबतही तो भिडल्याचं मैदानावर पाहायला मिळालं. गौतम गंभीर आणि जलदगती गोलंदाज श्रीसंत हे भर सामन्यात एकमेकांसमोर आले होते. तर, पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीसोबतचा गौतम गंभीरचा वाद चांगलाच गाजला आहे. मैदानात टशन-खुन्नस देणाऱ्या गौतम गंभीरला आता शांत-संयमी बनूनच टीम इंडियाच्या युवा संघाला जगजेत्ता बनविण्यासाठी मेंटोरशीप करायची आहे. त्यामुळे, मैदानात आणि मैदानाबाहेरही आक्रमक असलेला गौतम गंभीर आता प्रशिक्षकपदी आल्यानंतर स्वत:च्या शैलीत बदल करतो का हे येणार काळच सांगू शकेल. 


आफ्रिदीसोबत भिडला


पाकिस्तानचा माजी तडाखेबंद फलंदाज शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीरचा वाद सर्वज्ञात आहे. 2007 मध्ये कानपूर येथील सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच वादावादी झाली होती. गंभीरने आफ्रिदीला चौकार मारल्यानंतर दोघांची बाचाबाची झाली. त्यानंतर धाव घेताना दोघेही धडकले आणि वातवरण गरम झाले. यावेळी वेळीच पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. 


आयपीएलमध्ये विराटसोबत वाद


आयपीएलच्या मैदानातही गौतम गंभीरचा आक्रमकपणा दिसून आला आहे. लखनौ आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहली लखनौच्या खेळाडूला कीहीतरी सांगण्यासाठी पुढे आला, तेव्हा गंभीर विराटकडे आला आणि, काय आहे, मला बोल?, असे म्हणत विराटवर चिडल्याचं दिसून आलं होतं. माझ्या टीमला बोलणं हे मला बोलण्यासारखं आहे, असेही गंभीरने यावेळी म्हटले होते.  


प्रेक्षकांसोबतही गंभीरचा पंगा


आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सप्टेंबर 2023 मध्ये पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यातही गंभीरचा राग पाहायला मिळाला होता. या सामन्यादरम्यान गंभीर आणि प्रेक्षकांमध्येच खुन्नस दिसून आली. येथे प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाने घोषणाबाजी केल्यानंतर गौतम गंभीरने थेट प्रेक्षकांनाच मधलं बोट दाखवलं होतं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून समोर आला होता.  


श्रीसंतसोबत झाला होता वाद


लीजेंड लीगच्या एलिमिनेटरचा सामना इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यामध्ये गंभीर आणि श्रीसंतमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आधी एकमेकांना खुन्नस दिली त्यानंतर ब्रेकमध्ये एकमेकांना काहीतरी बोलत असल्याचं दिसलं. सामना संपल्यावर या वादावर बोलताना श्रीसंतने एक व्हिडीओ पोस्ट करत गंभीरवर निशाणा साधताना खळबळजनक आरोप केला आहे.


धोनीच्या शौर्यापेक्षा संघाचा विजय


टीम इंडियाने 2011 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा षटकार अजरामर ठरला आहे. धोनीने लगावलेल्या षटकावरुन बोलताना गंभीरने केलेल्या विधानाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. धोनीच्या शौर्यापेक्षा हा विजय संपूर्ण भारतीय संघाचा आणि सपोर्ट स्टाफचा असल्याचं गौतम गंभीरने म्हटलं होतं. 


हेही वाचा


Gautam Gambhir : मोठी बातमी, गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड, जय शाह यांच्याकडून अधिकृत घोषणा