हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना उद्या होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे झिम्बॉब्वेत दाखल झाले आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतानं विजेतेपद मिळवल्यानंतर संघ बारबाडोसमध्ये अडकून पडला होता. यामुळं संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे देखील अडकून पडले होते. भारतात दाखल झाल्यानंतर विजय परेडमध्ये सहभाग घेतल्यानंतर हे तिघे झिम्बॉब्वेत दाखल झाले आहेत. झिम्बॉब्वेनं पहिल्या मॅचमध्ये भारताला 13 धावांनी पराभूत केलं. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारतानं कमबॅक करत 100 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या मॅचमध्ये अभिषेक शर्मानं दमदार कामगिरी करत 100 धावा केल्या होत्या.
शुभमन गिल समोर पेच?
यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, संजू सॅमसन यांना झिम्बॉब्वेत पोहोचण्यास उशीर होत असल्यानं टीम इंडियानं पर्यायी व्यवस्था केली होती. अभिषेक शर्मानं पहिल्या दोन मॅचमध्ये शुभमन गिल सोबत डावाची सुरुवात केली होती. अभिषेक शर्माला पहिल्या मॅचमध्ये खातं उघडण्यात अपयश आलं तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं 7 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर त्यानं 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. आता यशस्वी जयस्वाल झिम्बॉब्वेत दाखल झाल्यानं कुणाला संधी द्यायची असा प्रश्न शुभमन गिल समोर निर्माण झालाय.
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेला संधी मिळाल्यास कोण बाहेर जाणार?
संजू सॅमसनला शुभमन गिलनं संघात स्थान दिल्यास ध्रुव जुरेलला संघाबाहेर जावं लागणार आहे. ध्रुव जुरेलनं पहिल्या दोन टी 20 मॅचेसमध्ये स्थान मिळालं होतं. शिवम दुबेला संघात स्थान मिळाल्यास साई सुदर्शनला संघाबाहेर जावं लागू शकतं. यशस्वी जयस्वालला संघात संधी दिली गेल्यास अभिषेक शर्माला संघाबाहेर जावं लागू शकतं.
शुभमन गिल तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये गोलंदाजांमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. आवेश खान आणि मुकेश कुमार चांगली गोलंदाजी करत आहेत. रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळं शुभमन गिल कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवून कोणता संघ आघाडी घेणार ते पाहावं लागेल. भारत आघाडी घेणार की झिम्बॉब्वे पलटवार करणार हे पाहावं लागेल. झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांनी पहिल्या टी 20 मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती.
संबंधित बातम्या :
वनडे वर्ल्ड कपमधील दुखापत, आयपीएलचं अपयश ते टी 20 वर्ल्डकपमधील विजय, हार्दिकनं सगळं सांगितलं