Sachin Tendulkar Twwet On Ramakant Achrekar : देशभरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं आदराचं आणि महत्त्वाचं स्थान असतं. गुरुपौर्णिमा म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो. सगळ्यांप्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपट्टू भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही गुरु रमाकांत आचरेकर यांना मानवंदना दिली. सचिन तेंडुलकर याने रमाकांत आचरेकर यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेणाऱ्या 12 खेळाडूंचा फोटो पोस्ट करत सचिन तेंडुलकर याने आचरेकर सरांना अनोखी मानवंदना दिली आहे. शिक्षकांमुळे फरक पडतो, वर्गामुळे नाही, हा मायकल मोरपुर्गो यांचा कोट पोस्ट करत सचिन तेंडुलकर याने आचरेकर सरांना मानवंदना दिली.


पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरने काय म्हटले ?


एखादा वर्ग वर्गामुळे वेगळा नसतो, तर त्या वर्गाचे शिक्षक त्या वर्गाला वेगळे करतात. आम्ही सर्वजण आचरेकर सरांच्या महान क्रिकेट अकादमीचा भाग होतो. त्यांच्यासारख्या निःस्वार्थी व्यक्तिकडून क्रिकेट शिकलो, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा., असे कॅप्शन पोस्ट करत 12 शिष्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. 


 12 खेळाडू कोण कोणते ?-


सचिन तेंडुलकर याच्याशिवाय रामनाथ पारकर, बलविंदर सिंह संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, विनोद कांबळी, पारस महाम्ब्रे, अजीत अगरकर, समीर दिघे, संजय बांगर आणि रमेश पवार या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. 


आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं -
सचिनच्या जडणघडणीत आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दित अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये सचिनचा उल्लेख केला जातो. क्रिकेटमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला देशातील 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.



सचिन तेंडुलकरची पोस्ट व्हायरल - 


सचिन तेंडुलकर याने आचरेकर सरांसाठी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अल्पावधीतच या पोस्टला 303.5K लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी ही पोस्ट रिट्विटही केली आहे.