Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे.
श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांचे उत्तर दिले. विराट कोहली आणि रोहित शर्माकडे भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. विराट आणि रोहित दोघंही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. ते दोघं कोणत्याही संघात नक्कीच असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी असो, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका असो आणि दोघांची फिटनेस चांगली राहिल्यास 2027 चा विश्वचषकही ते खेळू शकतात, असं गौतम गंभीरने सांगितले.
रवींद्र जडेजाला संघातून का वगळले?
अजित आगरकर यांनी रवींद्र जडेजाबाबत मत व्यक्त केले. अजित आगरकर म्हणाले की, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची एकत्र निवड करण्यात काही अर्थ नाही, रवींद्र जडेजाला संघातून काढून टाकण्यात आलेले नाही. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आमचे दोन्ही खेळाडू निवडले जावेत असे आम्हाला वाटत नाही. आमच्यासाठी खूप महत्त्वाची कसोटी मालिका आहे. रवींद्र जडेजाला वगळण्यात आलेले नाही, मात्र त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती अजित आगरकर यांनी दिली.
हार्दिक पांड्याची फिटनेस हे एक आव्हान-
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली.