चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याची विराट कोहली यानं मुलाखत घेतली. बांगलादेश विरुद्धच्या कसोटीपूर्वी बीसीसीआय टीव्हीसाठी विराट कोहलीनं गौतम गंभीरची मुलाखत घेतली. यामध्ये दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी सामन्यांबाबत देखील चर्चा झाली. विराट कोहली यानं गौतम गंभीर याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना गौतम गंभीर यानं मनमोकळेपणानं उत्तर दिलं. गंभीरनं या मुलाखतीत विराटचं देखील कौतुक केलं. 


भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा विचार काही महिन्यांपूर्वी देखील केलेला नव्हता. भारताच्या क्रिकेट टीमला मार्गदर्शन करणं ही सन्मानाची बाब आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये पुन्हा प्रवेश करता आला, असं गौतम गंभीर म्हणाला.आपल्यापुढं चॅम्पियन्स ट्रॉफी,टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आहे. तुम्हाला कधी स्वत:ला आव्हान देता आलं पाहिजे. यामुळं मी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतल्याचं गौतम गंभीर यानं म्हटलं.


गंभीरनं सांगितली कोहलीची जुनी आठवण


विराट कोहलीनं भारताच्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेबद्दल प्रश्न विचारताच गौतम गंभीर यानं एक आठवण सांगितली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या त्या मालिकेत विराट कोहलीनं अनेक धावा काढल्या होत्या, असं गंभीरनं सांगितलं होतं. त्या मालिकेमध्ये प्रत्येक बॉलनंतर ‘ॐ नमः शिवाय’ बोलत असल्याचं तू मला सांगितलं होतं, असं गौतम गंभीर यानं विराट कोहलीला म्हटलं.


ऑस्ट्रेलियातील त्या खेळी दरम्यान विराट कोहली ओम नम: शिवाय म्हणत होता. तर, मी नेपियरच्या खेळी दरम्यान हनुमान चालिसा ऐकत होतो, अशी आठवण देखील गौतम गंभीरनं सांगितली.  तुम्ही करिअरच्या एका टप्प्यावर अशा स्थितीतून जात  असता, नेपियरच्या कसोटीत पाचव्या दिवशी पहिल्या अडीच तासात व्हीव्हीएस लक्ष्मण सोबत एक शब्दही बोललो नसल्याचं लक्षात आणून दिलं होतं. पुन्हा या स्थितीतून जायचं नाही, असं लक्ष्मणनं सांगितल्याची आठवण गंभीरनं सांगितली. 


कसोटी क्रिकेट हे क्रिकेटपटूच्या क्षमतांची चाचणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं मत गौतम गंभीर यानं व्यक्त केलं. याशिवाय भारताला पुढील काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करायची असल्यास आपल्याकडे चांगले गोलंदाज असायला हवेत, असंही गंभीर म्हणाला. भारतात आगामी काळात दर्जेदार फलंदाज तयार होतील. पण, भारताला फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांची कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी गरज असल्याच्या मुद्यावर दोघांचं एकमत झालं. तर, विराट कोहली पुढची मुलाखत रोहित शर्माची घेणार असल्याचं देखील स्पष्ट झालं.  


इतर बातम्या :