Gautam Gambhir BCCI: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 9 जून रोजी गौतम गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली.  टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.


गौतम गंभीरची बीसीसीआयकडे काही मागण्या ठेवल्या होत्या. त्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याने मुख्य प्रशिक्षकपद स्विकारल्याची चर्चा होती. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळावी, असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. टीम इंडिया जुलै महिनाअखेर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट, या दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि टी20 मालिका होणार आहे. सध्या टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असून 5 सामन्याची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावत आहे. मात्र एका रिपोर्टनूसार, गौतम गंभीरने झिम्बाब्वे दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु गौतम गंभीरची ही मागणी बीसीसीआयने फेटाळत श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियात सहभागी होण्यास सांगितले. 


सपोर्ट स्टाफसाठीही लवकरच अर्ज मागवणार -


बीसीसीआय लवकरच सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवणार आहे. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील फक्त टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत टीम इंडियासोबत होते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 


संबंधित बातमी:


गौतम गंभीरचा भिडू होणार टीम इंडियाचा बॅटिंग कोच; केकेआरला आणखी एक धक्का बसणार?