PCB Selection Committee Change : टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये गंभीर युगाला सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून गौतम गंभीरची निवड केली. पण तिकडे पाकिस्तान क्रिकेटमध्येही मोठा बदल झालाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समितीमध्ये मोठा बदल केला आहे. वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना पदावरुन बर्खास्त करण्यात आले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने हा निर्णय घेतला.


अब्दुल रझाक नुकताच पुरुष आणि महिला संघाच्या निवड समितीचा भाग बनला होता, तर वहाब रियाझ पुरुष निवड समितीचा भाग होता. पण विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर या दोघांना काढून टाकण्यात आले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचे विश्वचषकात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते.


ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार 2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची नाचक्की झाल्यानंतर  निवडकर्ता म्हणून वाहब रियाज याच्या पदावर गदा येणार असल्याची चर्चा सुरु होती. वाहब आधी संघाचा मुख्य निवडकर्ता होता, पण नंतर त्याला संघाच्या निवड समितीचे सदस्य बनवण्यात आले. माजी वेगवान गोलंदाज अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकासाठी व्यवस्थापक म्हणून पाकिस्तानसोबत होता. 


4 वर्षांत सहा सिलेक्टर्स


मागील चार वर्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये  6 सिलेक्टर्स दिसले आहेत. ज्यामध्ये वहाब रियाझ हा शेवटचा होता. या 6 निवडकर्त्यांच्या यादीत वहाब रिझाई, मोहम्मद वसीम, शाहिद आफ्रिदी, इंझमाम उल हक, हारून रशीद आणि मिसबाह उल हक यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ जास्त नव्हता.  पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर निवड समिती अध्यक्षांना पायउतार करण्यात येत असल्याचे दिसतेय. 


विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी - 


अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला आयर्लंड आणि कॅनडाविरोधात विजय मिळवता आला. टी20 विश्वचषकात खराब कामगिरी कऱणाऱ्या पाकिस्तानला टीकेचा सामना करावा लागला होता.