नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) पदावर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आधुनिक काळातील बदलत्या क्रिकेटच्या स्वरुपामुळं  गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याचं जय शाह (Jay Shah) यांनी म्हटलं.  जय शाह यांनी बीसीसीआयच्या वतीनं गौतम गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा केली. गौतम गंभीर भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून संघासोबत असेल. गौतम गंभीरला 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंतचा वेळ बीसीसीआयकडून देण्यात आला आहे. या काळात आयसीसीच्या चार प्रमुख स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा जिंकण्याचं आव्हान गौतम गंभीर समोर असेल.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 



टी 20  वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप


भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात 2011 ला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर भारताला विश्वविजेतेपद मिळवता आलेलं नाही. भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताचा पराभव झाला. आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून देणं हे देखील गौतम गंभीरचं प्रमुख टार्गेट असेल. 


भारतात 2026 टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. हे विजेतेपद कायम ठेवण्याचं आव्हान देखील गंभीर पुढं असणार आहे.  


गौतम गंभीरची कारकीर्द


गौतम गंभीरनं भारताकडून 58 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 9 शतकं आणि 22 अर्धशतकं केली आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 4154 धावा आहेत. गंभीरनं भारतासाठी 147 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये गंभीरनं 11 शतकं आणि 34 अर्धशतकं केली आहेत. गंभीरच्या नावावर 5238 धावा आहेत. गंभीरनं 37 टी 20 सामने खेळले असून त्यात त्यानं 7 अर्धशतकं केली आहेत.
 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.


गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सला दोनवेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात गंभीरनं केकेआरचं मेंटॉर म्हणून काम केलं.  केकेरआनं 2024 ला विजेतेपद मिळवलं. आता भारताला आयसीसीच्या चार स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देणं गंभीर पुढील आव्हान असेल. 


संबंधित बातम्या :


Gautam Gambhir : मोठी बातमी, गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड, जय शाह यांच्याकडून अधिकृत घोषणा


Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार