IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना गुरुवारी (9 जून) दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळं भारताला सात विकेट्सनं पराभव पत्कारावा लागला. या सामन्यादरम्यानचा तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यात दोन प्रेक्षक एकमेकांशी भिडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 


भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लगला आहे.  या व्हिडिओत सामना पाहण्यासाठी आलेले दोन प्रेक्षक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच हे दोघ एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मैदानातील सुरक्षा रक्षकाला मध्यस्ती करावी लागली. 


व्हिडिओ-



टीम इंडिया कमबॅकसाठी सज्ज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 12 जून रोजी कटक येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी आपल्या स्पेलमध्ये प्रत्येकी 43-43 धावा दिल्या. याशिवाय, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेललाही या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. 


डेव्हिड मिलर, रासी व्हॅन डर डसेन ठरले दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.


हे देखील वाचा-