T20 World Cup 2024 : पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच पाकिस्तानच्या विश्वचषकातील संघावर विश्वास नसल्याचं दिसतेय. राशिद लतीफ आणि जावेद मयांदाद यांनी पाकिस्तान संघाच्या कमकूवत बाजू सांगितल्या. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन जूनपासून टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होत आहे. पण या विश्वचषकात पाकिस्तानकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा नसल्याचं माजी खेळाडूंनी सांगितलेय. पाकिस्तान संघाने आयर्लंडविरोधात पहिला टी20 सामना गमावला. त्यानंतर इंग्लंडविरोधात 2-0 च्या पराभवाचा सामना करावा लागला. मायदेशात न्यूझीलंडच्या ब संघाकडूनही कडवी टक्कर मिळाली, मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. त्यामुळेच कदाचीत पाकिस्तान संघ माजी खेळाडूंच्या निशाण्यावर दिसतोय. 


राशिद लतीफ काय म्हणाला - 


पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ यानं पाकिस्तान संघावर टीका केली. तो म्हणाला की, "पाकिस्तान संघाला त्याचे संयोजन योग्य जमत नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. " पाकिस्तान संघाला आपल्या फलंदाजीत बदलाची गरज आहे, त्याशिवाय फिरकीचा अधिक वापर करावा लागेल, असेही लतीफ म्हणाले. "संघात बदल झाल्यामुळे खेळाडूंना गरजेनुसार भूमिका बदलण्यास तयार राहावे लागेल," असेही लतीफ यांनी सांगितले. 


जावेद मियांदाद काय म्हणाले... 


पाकिस्तानचे दिग्गज जावेद मियांदाद  यांना बाबरच्या संघाकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा आहे. जावेद मियांदाद म्हणाले की, पाकिस्तान संघाने विश्वचषकात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे, पण सध्या संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे. काही विभागात पाकिस्तानला बदल करण्याची गरज आहे. विश्वचषक स्पर्धा 20 संघामध्ये होत आहे, त्यामुळे कुणालाही हलक्यात घेऊन चालणार नाही, असे जावेद मियांदाद म्हणाले. 


संघ निवडीवरही अनेकजण नाराज - 


पाकिस्तानमधील अनेक क्रिकेट चाहते आझम खान याच्या निवडीवर आणि कामगिरीवर नाराज आहे. ओव्हलवर आझम खान स्वस्तात बाद झालाच, पण फिल्डिंग करताना महत्वाचे दोन झेलही सोडले. विकेटकिपर फलंदाज म्हणून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या आझम खान याला खराब फिल्डिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 


आझम खान याच्याशिवाय अष्टपैलू शादाब खान आणि लोअर ऑर्डर फलंदाज इफ्तिखार अहमद यांच्या कामगिरीवरही पाकिस्तानचे चाहते नाराज आहेत. दोघांना धावा काढताना संघर्ष करावा लागतोय नसीम शाह आणि मोहम्मद आणिर यासारखे वेगवान गोलंदाज लयीत नाही, इंग्लंडविरोधात त्यांची गोलंदाजी महागडी ठरली होती. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील (पीसीबी) काही अधिकारी चिंतेत आहे, जर पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचला नाही तर चॅम्पियन ट्रॉफीच्या  तयारीवर परिणाम होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये होणार आहे, त्याचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. एका पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  जर पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याचा परिणाम जाहीरातदारावर आणि चाहत्यांवर पडू शकतो. 


माजी खेळाडू बासित अली म्हणाला की, बाबर आझम याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. मोहम्मद रिझवान आणि सईम किंवा फखर यांनी डावाची सुरुवात करायला हवी.