Eoin Morgan On Jos Buttler : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यावेळी इंग्लंड संघात जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू असतानाही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने संघावर आणि नवनिर्वाचित कर्णधार बटलरबाबत अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अशामध्ये माजी कर्णधार इयॉन मॉर्गननेही (Eoin Morgan) बटलरबाबत आपली प्रतिक्रिया दिली. 'चूकांतूनच तो शिकेल आणि संघाला योग्यप्रकारे लीड करण्याची हीच वेळ आहे' असं मॉर्गन म्हणाला आहे. 


'चूकांतूनच शिकेल'


काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणत मॉर्गनने निवृत्ती घेतली. त्यामुळे इंग्लंडचा नवा कर्णधार म्हणून जोस बटलरची (Jos Buttler) नियुक्ती करण्यात आली. ज्यानंतर बटलरच्या नेतृत्त्वाखाली पहिली टी20 मालिका इंग्लंडने गमावली. आता पहिल्या एकदिवसीय सामन्यातच इंग्लंडला तब्बल 10 विकेट्सने पराभव मिळाला. ज्यानंतर मॉर्गनने बटलरबाबत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''अशाप्रकारे मोठा पराभव मिळाल्यानंतर कर्णधार म्हणून काय वाटतं हे मी जाणून आहे. मला असं वाटतं बटलर या चूकांमधूनच शिकेल. पराभवाला संधी म्हणून पाहावं आणि चूकांमधून शिकून संघाला योग्य प्रकारे लीड करावं. संघाला पुढे नेण्याची हीच वेळ आहे. अशा पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये सर्वजण आपल्याला लक्ष देऊन ऐकतात'' 


तब्बल 10 विकेट्सनी भारत विजयी


भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या वेगवान सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आणि अवघ्या 110 धावांत इंग्लंडला रोखलं. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या. 111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना भारताने सुरुवातीपासून संयमी पण दमदार फलंदाजी कायम ठेवली. भारताची सर्वात अनुभवी जोडी रोहित-शिखर मैदानात असल्याने विजय मिळवणं आणखी सोपा झाला. रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली. रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला. 


हे देखील वाचा-