IND vs ENG, 1st ODI, The Oval Stadium: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी आधी भारताने भेदक अशी गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. ज्यानंतर 111 धावांचं लक्ष्य केवळ 18.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केलं. हा विजय मिळवत मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे.






 


भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या वेगवान सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आणि अवघ्या 110 धावांत इंग्लंडला रोखलं. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.


रोहित-धवन जोडीने मिळवला विजय


111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना भारताने सुरुवातीपासून संयमी पण दमदार फलंदाजी कायम ठेवली. भारताची सर्वात अनुभवी जोडी रोहित-शिखर मैदानात असल्याने विजय मिळवणं आणखी सोपा झाला. रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली. रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला. 


हे देखील वाचा-