लंडन : विश्वचषकात टीम इंडियासाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या महत्त्वाची भूमिका निभावेल. विश्वचषक 2011 मध्ये युवराज सिंगने टीम इंडियासाठी जी कामगिरी केली होती, तीच या विश्वचषकात हार्दिक करेल, असं ऑस्ट्रेलियाचा माजी जलद गोलंदाज ग्रेन मॅकग्राने म्हटलं आहे.
मॅकग्राला विचारण्यात आलं होतं की, 2011 विश्वचषकातील युवराजची कमी भारतीय संघाला जाणवेल का? यावर बोलताना मॅकग्राने सांगितलं की, "हार्दिक पंड्या युवराजची कमी भरुन काढेल. दिनेश कार्तिकही उत्तम फिनिशर आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे."
युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल दाखवली होती. 2011 चा विश्वचषक जिंकण्यात युवराज सिंगचा मोलाचा वाटा होता. तसेच मॅन ऑफ द सीरिजचा खिताबही युवराजने पटकावला होता.
टीम इंडियाची गोलंदाजी देखील जमेची बाजू आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात आहे. अंतिम षटकांत चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता बुमराहमध्ये आहे. भारतीय संघ सर्व बाजूने उजवा आहे. मात्र इंग्लंडमधील मैदानांमध्ये भारतीय खेळाडू कसे खेळतात हे पाहावं लागेल, असं मॅकग्राने म्हटलं.