ENG vs WI : ‘चॅम्पियन’ वेस्ट इंडिज 55 धावांवर गारद, इंग्लंडची विजयी सुरवात
T20 World Cup 2021, England vs West Indies : टी-20 मधील वेस्ट इंडिज संघाची ही दुसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी 2019 मध्ये इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजला 44 धावांवर गारद केलं होतं.
T20 World Cup 2021, England vs West Indies : शनिवारपासून टी-20 विश्वचषकाच्या मेजवानीला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. तर सायंकाळी झालेल्या सामन्यात इंग्लंड संघानं दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत वेस्ट विंडिजच्या विस्फोटक फलंदाजांना स्वस्तात माघारी झाडलं. वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 55 धावांवर गारद झाला. टी-20 मधील वेस्ट इंडिज संघाची ही दुसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी 2019 मध्ये इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजला 44 धावांवर गारद केलं होतं.
टी- 20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup 2021) पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजींनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. ख्रिस गेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. दहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. गेल यानं 13 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशीद याने घातक गोलंदाजी केली. आदिल रशीदने अवघ्या दोन धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजने १५ षटकांत अवघ्या 55 धावा केल्या.
56 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाने नवव्या षटकात विजय मिळवला. मात्र, इंग्लंडला चार विकेट गमावाव्या लागल्या. इंग्लंड संघाकडून बटलरने सर्वाधिक 24 धावा चोपल्या. कर्णधार इयॉन मॉर्गनसोबत बटलरने संघाला विजय मिळवून दिला. यासह इंग्लंड संघानं टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयी अभियानानं केली. वेस्ट संघाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. सिमन्स, गेल, हेटमायर, ब्राव्हो, पोलार्ड, रसेल, पूरन यासारखे एकापेक्षा एक सरस टी-20 खेळाडू असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिज संघ 2016 च्या विश्वचषकाचा विजेता आहे.
An excellent bowling performance helps England get off to a flyer in their #T20WorldCup 2021 campaign #ENGvWI | https://t.co/bO59jyDrzE pic.twitter.com/5VaR7YL1uZ
— T20 World Cup (@T20WorldCup) October 23, 2021