ICC World Cup 2023: भारतात पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटच्या निवृत्तीतून माघार घेणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगलीय. नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यास बेन स्टोक्सनं महत्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सनं नाबाद 53 धावांची खेळी केली. दरम्यान, 2019 मध्ये इंग्लंडच्या संघानं पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं. तेव्हाही बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्टोक्सनं नाबाद 92 धावांची खेळी साकारली होती. यामुळं आगामी एकदिवसीय विश्वचषकात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचा आधारस्तंभ म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण ज्यावेळी स्टोक्सनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा प्रशिक्षक मॅथ्यू मॉटनं त्याच्यासाठी कधीही एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे असल्याची त्याला ऑफर दिली होती.


बेन स्टोक्सनं याचवर्षी जुलै महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वर्कलोडचं कारण देत त्यानं एकदिवसीय कारकिर्दीला पूर्णविराम लावत असल्याची घोषणा केली. मात्र, त्यावेळी इंग्लंडचे एकदिवसीय संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी स्टोक्सशी संवाद साधला. तसेच तो कधीही निवृत्तीतून माघार घेऊ शकतो, असं मॅथ्यू मॉट यांनी म्हटलं होतं. मेलबर्नमध्ये पत्रकाराशी बोलताना मॅथ्यू मॉट म्हणाले की, “जेव्हा त्यानं मला त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितलं, तेव्हा मी त्याच्या कोणत्याही निर्णयाचं समर्थन करणार नाही असं सांगितलं. त्याला निवृत्त होण्याची गरज नाही. त्यानं काही काळ एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी. मी त्याला म्हणालो की तो कधीही एकदिवसीय क्रिकेटच्या निवृत्तीमधून माघार घेऊ शकतो. पण हा त्याचा निर्णय असेल. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आम्ही टी-20 क्रिकेटकडं दुर्लक्ष करणार आहोत. पण स्टोक्सनं निवृत्तीतून माघार घ्यायची की नाही, हा त्याचा निर्णय असेल."


स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडच्या कसोटी संघाची चांगली कामगिरी
स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. माजी कर्णधार जो रूटनंतर स्टोक्सला ही जबाबदारी देण्यात आली होती. स्टोक्सच्या कसोटीतील कामगिरीबद्दल बोलताना मॅथ्यू मॉट म्हणाला, “स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ कसोटी संघात चांगली कामगिरी करत आहे.


बेन स्टोक्सची कारकिर्द
बेन स्टोक्सनं आतापर्यंत 104 सामन्यात इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. यातील 89 डावात त्यानं 2 हजार 919 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याची सरासरी 39.45 आणि स्ट्राइक रेट 95.27 इतका राहिला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 102 आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं तीन शतकं आणि 21 अर्धशतकं झळकावली आहेत.त्याचबरोबर गोलंदाजीत त्यानं 87 डावात 74 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 एवढा राहिला आहे. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 61 धावांत पाच विकेट अशी आहे.


हे देखील वाचा-