Kieron Pollard : स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) मुंबई इंडियन्ससोबतचा (MI) 12 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने रिलीज केल्यानंत पोलार्डने हा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी तब्बल 189 आयपीएल सामने खेळले आहेत. तो मुंबई संघाकडून चॅम्पियन्स लीगमध्येही खेळला आहे. एकूणच, त्याने मुंबईसाठी तब्बल 211 सामने खेळले आहेत ज्यामुळे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा परदेशी खेळाडू पोलार्ड ठरला आहे.
एकाच संघाकडून सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा पोलार्ड हा परदेशी खेळाडू असून त्याच्या पाठोपाठ एबी डिव्हिलियर्स चा नंबर लागतो. डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 157 सामने खेळले आहेत. पोलार्ड आणि डिव्हिलियर्सच्या सामन्यांची तुलना करताना पोलार्ड बराच पुढे आहे. यानंतर सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून 157 सामने खेळले आहेत. लसिथ मलिंगानेही मुंबईसाठी 139 सामने खेळले असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
पोलार्डची मुंबई इंडियन्ससोबतची कारकिर्द
पोलार्डने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे. त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.
भावूक पोस्ट शेअर करत पोलार्डचा आयपीएलला अलविदा
पोलार्डने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबई इंडियन्समध्ये बदलांची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकलो नाही तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबईचाच राहणार आहे.''
हे देखील वाचा-