Pune MPL 2024 :  अथर्व काळे(५७धावा) याने केलेल्या झंझावती अर्धशतकी खेळीसह मुकेश चौधरी(४-२६)  याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नाशिक टायटन्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह नाशिक संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ईगल नाशिक टायटन्स संघाने १० सामन्यात ६ विजयासह अव्वल स्थान पटकावले.   


गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे  प्रत्येकी १४ षटकांचा खेळविण्यात आला. ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १४षटकात ७बाद १५६धावा केल्या. अर्शिन कुलकर्णी खाते न उघडताच परतला. निखिल कदमने अर्शिनला झेल बाद केले. पाठोपाठ साहिल पारख(२धावा)ला बाद करून ईगल नाशिक टायटन्सला निखिल कदमने दुसरा धक्का दिला. कौशल तांबेने २४चेंडूत ३४धावांचे योगदान दिले. त्यात त्याने १चौकार व ३ षटकार खेचले. पाचव्या षटकात मंदार भंडारीला तनय संघवीने बाद केले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या अथर्व काळेने १८ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी करत रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यात त्याने १चौकार व ८ टोलेजंग षटकार मारले. अथर्व व कौशल यांनी चौथ्या विकेटसाठी ३१चेंडूत ७२धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. हे दोघेही बाद झाल्यावर रणजीत निकम(१४) व धनराज शिंदे(२१धावा) यांनी संघाला १५६धावांचे आव्हान उभे करून दिले. 


याच्या उत्तरात रायगड रॉयल्स संघाला १४षटकात ९बाद १२४धावाच करता आल्या. यात सिद्धेश वीर(६), मेहुल पटेल(७)हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नौशाद शेखने २५चेंडूत २चौकार व ३ षटकारासह ४२धावा, यश नाहरने २०चेंडूत २८धावा केल्या. पण त्यानंतर विकी ओस्तवाल(२१), ऋषभ राठोड(१०)हे बाद झाल्यावर एकही फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही. ईगल नाशिक टायटन्सकडून मुकेश चौधरीने २६धावात ४ बळी टिपले. तर, प्रशांत सोळंकीने २६ धावात २गडी, समाधान पांगरेने ११धावात १ गडी बाद करून मुकेशला साथ दिली. 


संक्षिप्त धावफलक 


ईगल नाशिक टायटन्स: १४षटकात ७बाद १५६धावा(अथर्व काळे ५७(१८,१x४,८x६), कौशल तांबे ३४(२४,१x४,३x६), मंदार भंडारी २२, धनराज शिंदे २१, रणजीत निकम १४, निखिल कदम २-२५, तनय संघवी २-२७, मनोज इंगळे १-२३, विकी ओस्तवाल १-५०) वि.वि.रायगड रॉयल्स: १४षटकात ९बाद १२४धावा(नौशाद शेख ४२(२५,२x४,३x६), यश नाहर २८, विकी ओस्तवाल २१, मुकेश चौधरी ४-२६, प्रशांत सोळंकी २-२६, समाधान पांगरे १-११); सामनावीर - अथर्व काळे