Dilip Vengsarkar on Virat Kohli captaincy issue : भारताच्या एकदिवसीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली  (Sourav Ganguly)  यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. विराटला कर्णधारपदावरून बाजूला करून भारताचा फलंदाज रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्यापासून क्रिकेट विश्वात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता भारताचे माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी उडी घेतली आहे. सौरव गांगुलीला निवड समितीच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नव्हता असे मत व्यक्त करत वेंगसरकरांनी सौरव गांगुली यांच्यावर टीका केली आहे. 


विराट कोहलीकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले होते. "टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून विराटला रोखण्यात आले होते. मात्र त्याने ऐकले नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून वनडेचं कर्णधारपदही काढून घ्यावे लागले" असे गांगुलीने सांगितले होते. "टी-20 आणि वनडेसाठी वेगळा कर्णधार असू नये ही निवड समितीची भूमिका आहे. त्यामुळेच बीसीसीआय आणि निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतल्याचे गांगुली यांनी म्हटले होते. या संदर्भात निवड समितीने आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणून आपण विराटशी संवाद साधल्याचेही गांगुली यांनी सांगितले होते. 


या वरून वेगसरकर यांनी गांगुली यांच्यावर टीका केली आहे. "कर्णधारपदावर कोणाला बसवायचे आणि कोणाला काढायचे याचा अधिकार बीसीसीआयच्या निवड समितीला आहे. त्यामुळे याबात बोलण्याचाही अधिकार समितीलाच आहे. गांगुली यांना निवड समितीच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु, ते जे बोलले आहेत ते अतिशय दुर्दैवी आहे."


सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत तीन सामन्यांची एक कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत आहे. 26 डिसेंबरपासून दोन्ही देशांमध्ये कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. त्या आधी विरोट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकारपरिषदेत कोहलीने सौरव गांगुली यांच्यावर आरोप केले होते. "कर्णधारपदावरून माझ्यासोबत कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नव्हते. शिवाय त्यासंदर्भात मला कोणी काहीच सांगितले नव्हते. आफ्रिका दौऱ्याआधी काही वेळ मला याबाबत माहिती मिळाली होती." असे आरोप कोहलीने केला होता.


दरम्यान, कोहलीच्या या आरोपांमुळे गांगुली यांनी आधी दिलेल्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यामुळे गांगुली-कोहली वाद चांगलाच रंगला होता. त्यामध्ये आता वेंगसरकरांनी गांगुली यांच्यावर टीका केली आहे. "गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांना निवड समितीच्या वतीने बोलण्याचा अधिकार नाही. गांगुली यांनी तसे बोलायला नको होते. परंतु, जे झाले ते अतिशय दुर्दैवी आहे. गांगुली यांनी क्रिकेटसाठी खूप योगदान दिले आहे. त्यामुळे विराटनेही त्यांचा आदर केला पाहिजे" असे वेगसरकर यांनी म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या