Virat Kohli Vs BCCI : भारतीयांसाठी क्रिकेट हा त्यांचा सर्वात आवडीचा खेळ. हा खेळ खेळणचं नाही तर, पाहणं किंवा त्यावरच्या चर्चा अशा साऱ्याच गोष्टींना भारतात तुफान प्रतिसाद मिळतो. भारतीयही आपल्या लाडक्या खेळाडूंवर आणि संघावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण याच भारतीय संघात मागील काही महिन्यांपासून वेगवेगळे वाद असल्याचं समोर येत आहे. आता या वादांच्या मागे कोण आहे?, कोणाची चूक आहे? अशा एक न अनेक प्रश्नांची उत्तरं भारतीय क्रिकेट प्रेमींना हवी आहेत...


तर टी20 विश्वचषक होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकानंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं घोषित केलं. पण एकदिवसीय संघ आणि कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाबाबत त्याने काहीच सांगितलं नव्हतं. पण नुकतंच आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला, यावेळी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहितचं नाव घोषित करण्यात आलं आणि पाहता पाहता भारतीय क्रिकेट संघात काही तरी वाद आहे, विराट विरुद्ध रोहित, विराट विरुद्ध बीसीसीआय, सौरव गांगुली विरुद्ध विराट अशा अनेक वादांबाबत चर्चा होऊ लागली. त्यात विराटने पत्रकार परिषद घेतल्यानंतर केलेल्या विविध खुलाश्यांमुळे तर नक्कीच काहीतरी मोठा वाद सुरु आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे.
 
काय म्हणाला विराट कोहली?


एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराटकडून रोहितकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराटच्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष होतं. ज्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने बरेच खुलासे केले. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदिसीय संघाचं कर्णधारपद माझ्याकडून काढून घेताना कोणतीच चर्चा झाली नव्हती. आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाच्या चर्चेबाबत फोन केला असता शेवटच्या पाच मिनिटांत तू वन-डेचा कर्णधार नसशील एवढं कळवण्यात आलं. दरम्यान याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटसोबत एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. जे वक्तव्य विराटच्या खुलाशामुळे खोटं ठरलं आहे. 


याशिवाय विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडतानाही बीसीसीआयला कळवलं होतं. तेव्हाही बीसीसीआयने केवळ होकार देत यावर कोणतीच चर्चा केली नव्हती, असंही विराट म्हणाला. तसंच आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय सामने खेळताना विराटला विश्रांती हवी आहे, तसंच त्याच्या मुलीचा वाढदिवस यादरम्यान असल्यानं त्याला सुट्टी हवी आहे. अशा बातम्याही समोर येत होत्या. यावर बोलताना विराटने मी अशी कोणतीच विनंती केली नसून एकदिवसीय संघातून खेळण्यासाठी मी तयार असल्याचं विराट म्हणाला. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये नक्कीच काहीतरी खटकत असल्याची शक्यता अजून दृढ झाली आहे.


विराट vs रोहित?


भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अव्वल दर्जाचे फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. पण या दोघांमध्येच आता वाद असल्याच्या चर्चा होत आहेत. याला कारणही तसंच आहे. कारण विराटकडे असणारं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद अचानक रोहित शर्माला देण्यात आलं. ज्यामुळे विराट फॅन्सतर नाराज झालेच. पण त्याच दरम्यान विराट आगामी आफ्रिका दौऱ्यात खाजगी कारणांमुळे एकदिवसीय संघात खेळणार नसल्याचं समोर आलं. अर्थात आता विराटने हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं असलं तरी आधी मात्र या वृत्तामुळे विराटला रोहितच्या नेतृत्त्वाखाली खेळायचे नाही अशीच चर्चा होत होती. दुसरीकडे रोहितही दुखापतीमुळे कसोटी संघातून बाहेर झाला. ज्यानंतर रोहितलाही विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळायचं नाही अशी चर्चा सुरु झाली. अर्थात या चर्चांमध्ये तथ्य नसलं तरी खरचं वाद आहे का? ही शक्यताही नाकारता येत नाही.


बीसीसीआयचं म्हणणं काय?


कर्णधारपदाच्या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने टी20 संघाचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं. ज्यानंतर मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार म्हणजे टी20 साठी रोहित आणि वन-डेसाठी विराट असल्यास संघाच्या खेळावर परिणाम होऊल त्यामुळे रोहितकडेच दोन्ही जबाबदाऱ्या दिल्याचं म्हटलं आहे.    



संबधित बातम्या