Dilip Vengsarkar Birthday : भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस. कपिल देव यांच्या भारतीय संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला, त्या संघात दिलीप वेंगसरकर आहेत. 6 एप्रिल 1956 रोजी जन्मलेले वेंगसरकर आता 67 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.


वेंगसरकर यांनी 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या इराणी ट्रॉफी सामन्यात तत्कालीन बॉम्बे संघाकडून खेळताना 110 धावांची शानदार खेळी केली होती. 'कर्नल' नावाने प्रसिद्ध असलेल्या वेंगसरकरांनी संपूर्ण कारकीर्दीत 116 कसोटी खेळल्या. यामध्ये त्यांनी 17 शतके आणि 35 अर्धशतकांसह 6,868 धावा केल्या. वन डे मध्ये त्यांनी 129 एकदिवसीय सामन्यात 3,508 धावा ठोकल्या.






जगातील पहिला नंबर वन फलंदाज 


1987 मध्ये जेव्हा रँकिंग सिस्टिम सुरू झाली, तेव्हा जगातील पहिला नंबर 1 बॅट्समन होण्याचा विक्रम वेंगसरकरांच्या नावावर आहे. 1987 मध्ये ते जगातील नंबर 1 कसोटीपटू म्हणून पहिल्या क्रमांकाच स्थान मिळवलं. वेंगसरकरांनी 64.46 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या.


न्यूझीलंविरुद्ध पदार्पण


1975 मध्ये इराणी करंडक स्पर्धेत शेष भारताविरुद्ध मुंबईकडून शतक झळकावल्यानंतर, खऱ्या अर्थाने वेंगसरकरांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 1975-76 मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलामीवीर म्हणून त्यांनी पदार्पण केले.


 क्रिकेटच्या पंढरीत 3 शतकं 


1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेले वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांत 6,868 धावा आणि 17 शतके झळकावली. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर त्यांनी तीन शतके ठोकली. 


वेंगसरकरांनी माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स यांच्यासारख्या वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणावर वर्चस्व गाजवलं. त्यांनी त्याकाळी अत्यंत आक्रमक असलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तब्बल सहा शतके झळकावली.


1987 च्या विश्वचषकानंतर वेंगसरकरांनी कपिल देव यांच्याकडून भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले, परंतु BCCI सोबतच्या वादामुळे 1989 मध्ये त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले. एका वर्षानंतर ते राष्ट्रीय संघात परतले, पण फॉर्म परत मिळवण्यात ते अपयशी ठरले.


वेंगसरकर 1992 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत स्वतःची क्रिकेट अकादमी सुरु केली. 2006 मध्ये, त्यांची बीसीसीआयने मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची निवड, वेंगसरकारांच्याच कारकिर्दीत झाली. 


वेंगसरकरांची 1983 च्या विश्वचषकातील भूमिका सर्वांना माहिती आहे. भारताच्या पहिल्या विश्वविजयावर नुकताच '83' नावाचा सिनेमादेखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारेने साकारली होती.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha