83 Movie Review : खरं तर 83 हा सिनेमा काय आहे किंवा त्याची गोष्ट काय आहे, हे आपल्या साऱ्यानांच माहिती आहे. 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाचा तो प्रवास आपल्यापैकी अनेकांनी पाहिला आहे, वाचला आहे किंवा ऐकला आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहायला जाताना प्रश्न एवढाच होता की कबीर खान आणि टीमने तो कसा साकारला आहे?
दिग्दर्शक कबीर खानचा हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर तो अनुभव आहे. तो काळ, ते सामने, ते वातावरण हे सारं ज्यांनी ज्यांनी अनुभवलं त्यांना हा सिनेमा पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जाईल. पण त्यासोबतच नव्या पिढीला भारतीय क्रिकेट काय आणि कोणत्या परिस्थितीतून गेलं, भारतीय क्रिकेटनं काय भोगलं, काय सोसलं आणि मग कसं ताठ मानेनं जगासमोर ते उभं राहिलं हे सारं हा सिनेमा जवळपास 150 मिनिटांत आपल्यासमोर मांडतो.
83 चित्रपटातल्या कलाकारांबद्दल आपण बोलणार आहोतच मात्र सगळ्यात जास्त कौतुक दिग्दर्शकाचं करावं लागेल. कारण या सिनेमात काय दाखवायचं यापेक्षा काय दाखवायचं नाही याची गणितं त्याच्या डोक्यात पक्की होती. त्यामुळे ही बॉलिवूड फिल्म असली तरी अनावश्यक मेलोड्रामा पूर्णपणे टाळला आहे. म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दिलीप वेंगसरकरांच्या जबड्यावर चेंडू आदळला आणि ते पूर्ण विश्वचषक खेळू शकणार नाहीत हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा इतर टिपिकल बॉलिवूडपटात दिसू शकलं असतं तसं रडकं गाणं इथं येत नाही किंवा केवळ दीपिका आहे म्हणून विनाकारण रोमँटिक सीन दिसत नाहीत किंवा तशी गाणी येत नाहीत.
त्यामुळं मेलोड्रामा, रोमान्स, गाणी, इमोशनल सीन्स किंवा मग रणवीर-दीपिकाचा स्टारडम या सगळ्यात न अडकता फक्त आणि फक्त भारतीय संघाच्या विजयी गाथेला हीरो मानून या सिनेमाचा डोलारा उभा राहिला आहे आणि म्हणूनच तो थेट काळजाला भिडतो.
प्रत्येक कलाकाराला, त्या भूमिकेला माणूस म्हणून ट्रीट केलं असल्यानं ते विश्व वास्तववादी वाटतं. नावं मोठी असली तरी कोणीही सुपरहीरो म्हणून आपल्यासमोर येत नाही. अर्थात प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी तितक्याच ताकदीनं पार पाडलीय. खरं तर कोणताही खेळ जेव्हा चित्रीत केला जातो तेव्हा त्या खेळातली सहजता कॅमेऱ्यामोर साकारणं तेवढं सोपं नसतं. आणि त्याच गोष्टीवर सिनेमाच्या टीमने जबरदस्त मेहनत घेतलीय. त्यामुळे यात येणारी खेळातली प्रत्येक नजाकत 'शॉट' म्हणून न येता खेळाचाच भाग बनते. त्यामुळे आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो.
चित्रपटात वेस्ट इंडिज टीमचा जो थाट आहे, जो अॅटिट्यूड आहे तो मात्र कमाल टिपण्यात आला आहे. त्यांचं विमानतळावरचं आगमन ते मैदानातला वावर अप्रतिम! ते कोणत्याच अर्थाने अभिनेते वाटत नाहीत. व्हिवियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, गार्नर अशा कॅरेबियन वीरांना त्या मोठ्या पडद्यावर पाहाताना छाती अक्षरश: दडपते. त्यातही सर व्हिव्हियन रिचर्ड्स जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येतात ती दृश्यं म्हणजे सोहळा आहे.
सिनेमाला जबरदस्त वेग आहे. मिनिटागणिक तो पुढे सरकत राहतो. कुठेही रेंगाळत नाही. पूर्वार्ध खिळवून ठेवतोच पण उत्तरार्धात मात्र अनेक रंग पाहायला मिळतात. भारताचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना, त्यातला कपिल देव यांची विश्वविक्रमी खेळी, इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना आणि मग 'द हिस्टॉरिक फायनल'. हे सगळंच अंगावर रोमांच उभं करतं. पडद्यावरच्या स्टेडियममधल्या प्रेक्षकांचा आवाज मोठा की थिएटरमधल्या प्रेक्षकांचा आवाज मोठा, हेच कळायचं बंद होत. थिएटरचं स्टेडियम होतं आणि 'अवघा रंग एक होतो'.
या सिनेमाच्या संगीताबद्दल बोलायचं झालं तर एकही गाणं लीप सिंक नाही हे सगळ्यात महत्वाचं. दिग्दर्शकाला यासाठी 'ब्राऊनी पॉईंट' दिला पाहिजे. जी काही गाणी आहेत ती बॅकग्राऊंडला वाजत राहातात आणि कथेचा भाग बनून येतात. संवादांच्या बाबतीतही अगदी तसंच.
अशा सिनेमात देशभक्तीची भावना चेतवणाऱ्या अनेक जागा असतात किंवा त्या निर्माण केल्या जातात. आता कशा टाळ्या वाजतात बघ… अशी पैज लावून पल्लेदार संवाद पेरले जातात. '83' मध्ये असं काहीच नाही. उत्तम संवाद असूनही ते कुठेही कथेला वरचढ होत नाहीत.
सगळ्या कलाकारांचं कामंही अगदी तसंच. महान खेळाडूंना साकारताना ती नक्कल वाटू नये याची प्रत्येकानेच काळजी घेतली आहे. वेंगसरकरांच्या भूमिकेत असलेल्या आदिनाथच्या वाट्याला आपल्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या चिराग पाटीलच्या तुलनेत कमी सीन असले तरी काही शॉट्समध्ये केवळ नजरेतून तो जिंकला आहे. पंकज त्रिपाठीबद्दल काही बोलायलाच नको. भूमिका कोणतीही असो त्याचं सोनं करणारा तो हाडाचा कलाकार आहे. इथंही त्याचा वावर सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. ताहीर राज भसिन, साकिब सलीम, हार्डी संधू, साहिल खट्टर, निशांत दाहिया, बमन इराणी ही सारीच मंडळी कमाल आहेत.
रणवीरला अगदी सुरुवातीला काही क्षण कपिल म्हणून स्विकारणं कठीण जातं. त्यानंतर मात्र हे सगळं मागे पडतं आणि ही गोष्ट आपला ताबा घेते.
या सिनेमाने विश्वचषकातल्या आपल्या त्या प्रवासातील प्रत्येक क्षण जिवंत केला आहे. त्यातल्या काही फ्रेम्स बघताना अंगावर शहारे येतात. कपिल देव यांचा नटराज शॉट, व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा पकडलेला झेल, इंग्लंडविरुद्धचा सामना संपायच्या आधीच मैदानात घुसलेले भारतीय चाहते, त्यावेळी संदीप पाटील यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू हे सगळं पाहताना आपण स्वत:ला हरवून जातोच पण त्यातही दिग्दर्शकाने एक सरप्राईज दिलंय ते म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या खऱ्या मॅचमधली दृश्यं पेरली आहेत. अगदी क्षणभर दर्शन देणाऱ्या त्या वीरांना पाहून आपल्याला वेड लागायचंच बाकी राहतं.
खरं तर सिनेमाच्या या साऱ्या जमेच्या बाजू मांडताना खटकणारं असं फार काही उरत नाही. शेवटी या सिनेमाची गोष्ट म्हणजे आपला अभिमान आहे. त्यामुळे शेवटी जेव्हा भारतीय टीम विश्वचषक उंचावताना आपण पाहातो तेव्हा आपले सगळे पैसे वसूल झालेले असतात.
पण डिस्क्लेमर एकच तुम्हाला जर क्रिकेट या खेळाचा जराही गंध नसेल (ज्याची शक्यता 'ना के बराबर है…') तर मात्र तुम्ही या सिनेमाला जाण्याआधी थोडाफार विचार करु शकता…