Baby AB Dewald Brevis in CSA T20 Challenge : दक्षिण आफ्रिका संघातील युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) याने तुफान फटकेबाजी करत टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टी20 चॅलेंजमध्ये (CSA T20 Challenge) टायटन्स संघाकडून 13 षटकार आणि 13 चौकार मारत 57 चेंडूत 162 धावा केल्या आहेत. त्याने अवघ्या अवघ्या 35 चेंडूत शतक पूर्ण केलं असून यानंतर सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डेवाल्डला त्याच्या मैदानाच्या सर्वबाजूस फटकेबाजी करण्याच्या कलेमुळे एबी डिव्हीलियर्सच्या नावाने बेबी एबी म्हणूनही ओळखलं जातं. दरम्यान त्याच्या या कामगिरीचं कौतुक करत स्वत: एबी डिव्हिलियर्सनेही त्याच्याबद्दल ट्वीट केलं आहे. 






दक्षिण आफ्रिकेत सुरु CSA T20 चॅलेंजच्या 25 व्या सामन्यात टायटन्स संघाकडून खेळताना फलंदाज डेवाल्डच्या या तुफान खेळीने मैदान हादरलं. ब्रेव्हिसने विरोधी संघ नाइट्सच्या गोलंदाजांवर असा हल्ला चढवला की प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो झालं होतं. ब्रेव्हिसच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 268 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये अशी धमाकेदार खेळी कधीकधीच पाहायला मिळते. डेवाल्डने आपल्या आजच्या खेळीमध्ये तब्बल 284.21 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. ब्रेव्हिसने यावेळी शतक केवळ 35 चेंडूंमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याने एकूण 57 चेंडूत 13 षटकार आणि 13 चौकारांसह 162 धावा केल्या. 


डेवाल्ड याला यंदा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने संघात घेतलं. त्याने अधिक सामने खेळले नाहीत पण काही सामन्यात चुणूक नक्कीच दाखवली. त्याला दक्षिण आफ्रिकेचा पुढचा एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखले जाते. सध्या त्याच्याकडे अधिक अनुभव नसल्याने तो विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात नाही. पण लवकरच तो संघात आगमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघातही तो आगामी आयपीएल 2023 मध्ये कमाल करेल अशी भारतीय फॅन्सना आशा आहे. 


हे देखील वाचा-