Afghanistan T20 League: तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. हजारो लोक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानबद्दल जगभरात चर्चा आहेत. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) सर्वांना चकीत करणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान काबूल क्रिकेट स्टेडियमवर घरगुती टी -20 स्पर्धा शपागीजा क्रिकेट लीग आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
या लीगमध्ये आणखी दोन संघांची भर पडल्याने एकूण संघांची संख्या 8 वर गेली आहे. या लीगची ही आठवी आवृत्ती असेल. सर्व आठ फ्रँचायझींचे मालकी हक्क गुरुवारी काबूलमधील एसीबीच्या मुख्य कार्यालयात आयोजित समारंभात विकले गेले. हिंदुकुश स्टार्स, पामीर जालमिया, स्पीनघर टायगर्स, काबुल ईगल्स, एमो शार्क्स, बोस्ट डिफेंडर, बंड-ए अमीर ड्रॅगन, मिस ए आयनाक नाईट्स या आठ फ्रँचायझी आहेत. हिंदुकुश स्टार्स आणि पामीर अलियान हे नवीन संघ जोडले गेले आहेत.
एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिंवारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की "यावेळी एससीएल प्रेक्षकांना आणि चाहत्यांना एक नवीन अनुभव देईल. खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्याही ते खूप चांगले असेल." त्यांनी गुरुवारी या स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. या दरम्यान नवीन संघांची माहिती देखील देण्यात आली.
मंडळाचा हा निर्णय सर्वांना चकीत करणारा आहे. कारण यावेळी अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयावह आहे. तालिबान या अतिरेकी संघटनेने काबूलसह संपूर्ण देश काबीज केला आहे. अलीकडेच, काबूल विमानतळाचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये लोक अमेरिकन सैन्याच्या विमानातून पडताना दिसत आहेत. आतापर्यंत, अफगाणिस्तानातून अनेक हृदय हेलावणारे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले आहेत. अशा वातावरणात ही देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे.