India vs Zimbabwe : भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजीत दीपक चाहर, प्रसिध कृष्णासह अक्षर पटेलने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत शिखर आणि शुभमन जोडीने एकहाती विजय मिळवून दिला. दरम्यान यावेळी दुखापतीतून सावरुन जवळपास सहा महिन्यानंतर मैदानात परतलेल्या दीपक चाहरला (Deepak Chahar) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पण सामन्यापूर्वी दीपक नर्व्हस असल्याचा खुलासा त्याने केला. नेमकं दीपक काय म्हणाला पाहूया...


भारताने 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना दीपक म्हणाला, ''सहा ते सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळताना तुम्ही नक्कीच नर्व्हस असता. पण मी या सामन्यापूर्वी पाच ते सहा सराव सामने खेळले होते. पण देशासाठी खेळताना तुमच्यावर जबाबदारी असते, तुम्ही चांगलीच कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरता.'' दरम्यान सामन्यापूर्वी निराश असल्याबाबत दीपकनं सामन्यानंतर सांगितलं असून त्यानेच सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली आणि 7 षटकांत केवळ 27 रन देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले.


सामन्याचा लेखा-जोखा


भारताने सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया यांना बाद करून दीपक चहरनं झिम्बाब्वेच्या संघाला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघानं सातत्यानं विकेट्स गमावली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली. ज्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाला 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, फिरकीपटू अक्षर पटेलच्या खात्यातही तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. 


त्यानंतर 190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम अशी सुरुवात भारताला करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच अगदी उत्तम फलंदाजी करत भारताला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. 


हे देखील वाचा-