T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात पाच फलंदाजांच्या बॅटीतून येऊ शकतात सर्वाधिक धावा; यादीत एकमेव भारतीय
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तानसह 13 संघांनी टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केलीय. मायभूमीत विश्वचषक स्पर्धा रंगणार असल्यानं ऑस्ट्रेलियाच्या संघ अधिक आत्मविश्वासानं मैदानात उतरेल. तर, यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांसारखे संघ संपूर्ण ताकद झोकून देतील. या मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करू शकतात, अशा पाच खेळाडूंवर एक नजर टाकुयात. विशेष म्हणजे, या यादीत एकमेव भारतीय फलंदाज आहे.
डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धोकादायक फलंदाजाच्या यादीत गणना केली जाते. वॉर्नर हा आयपीएलसह जगभरातील अनेक लीगमध्ये खेळताना दिसतो. टी-20 च्या फॉरमेटमध्ये डेविड वॉर्नरचे आकडे दमदार आहेत. आगामी टी-20 विश्वचषकात डेव्हिड वार्नरच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मोहम्मद रिझवान
टी-20 क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवान दमदार फॉर्ममध्ये आहे. या फॉरमेटमध्ये त्याच्या बॅटमधून खूप धावा निघाल्या आहेत. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषकात मोहम्मद रिझवान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मात्र, असं असतानाही पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या स्ट्राईक रेटवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, या फॉरमेटमध्ये तो एक आक्रमक फलंदाज आहे, यात काहीही शंका नाही. टी-20 विश्वचषकात मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानच्या संघाला मोठी अपेक्षा आहे.
क्विंटन डी कॉक
मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकची बॅट नेहमीच तळपल्याची दिसली. त्यानं आयपीएलसह जगभरातील अनेक लीगमध्ये चांगली कामगिरी बजावलीय. टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत क्विंटन डी कॉक सर्वाधिक धावा करण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत क्विंटन डी कॉककडं पावर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी असेल. दरम्यान, फाफ डू प्लेसिसच्या निवृत्तीनंतर क्विंटन डी कॉक हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असेल.
पथुम निसांका
श्रीलंकेच्या संघानं यंदाच्या आशिया चषकावर नाव कोरलं असलं तरी त्यांचा स्टार फलंदाज पथुम निसांकाला काही खास कामगिरी बजावता आली नाही. परंतु, त्यानं अनेक सामन्यात मोक्याच्या क्षणी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. पथुम निसांका यावर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. यामुळं आगामी टी-20 विश्वचषकात पथुम निसांकाच्या बॅटीतून सर्वाधिक धावा झळकण्याची शक्यता आहे.
विराट कोहली
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जवळपास तीन वर्षानंतर फॉर्ममध्ये आलाय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध वादळी शतकी खेळी करत त्याची सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना का केली जाते? हे दाखवून दिलं. विराट कोहलीनं आशिया चषक 2022 च्या 5 सामन्यात 276 धावा केल्या. आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताला आपल्या माजी कर्णधाराकडून मॅच-विनिंग इनिंगची अपेक्षा असेल.
हे देखील वाचा-