कोलंबो : चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये (Pakistan ) केलं जाणार आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक पीसीबीनं आयसीसीला (ICC) सादर करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत (Team India) आणि पाकिस्तानची मॅच 1 मार्च 2025 रोजी घेण्याचा पीसीबीचा प्रयत्न आहे. मात्र पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास भारत सरकार परवानगी देत नसल्याचं कारण देत बीसीसीआयनं (BCCI) टीम पाठवण्यास नकार देत हायब्रीड पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात यावं असं सूचवलं आहे.बीसीसीआयनं दुबई आणि श्रीलंका दोन ठिकाणांचा प्रस्ताव दिला आहे.मात्र, पीसीबीनं भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी यावं अशी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर कोलंबोमध्ये सुरु असलेल्या आयसीसीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.आयसीसीनं भारताचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं घेतली आहे. 


आयसीसीची नुकतीच कोलंबोत बैठक पार पडली. या बैठकीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन रजा नकवी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. या बैठकीत भारतानं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न  आयसीसीनं करावेत, अशी भूमिका पीसीबीनं घेतल्याची माहिती आहे. 


आयसीसीला भारताचं मन वळवण्यात यश येणार?


पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आवश्यक असलेल्या औपचारिक गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेल्या संभाव्य वेळापत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे.  याशिवाय स्पर्धेच्या आयोजनासाठी 1280 कोटी रुपयांच्या बजेटला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. आता केवळ आयसीसी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कसं मन वळवणार याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे. 


आता आयसीसीवर सर्वकाही अवलंबून आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला मंजुरी कधी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पीसीबीच्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार भारताचे सामने लाहोरमध्ये होणार आहेत. 


दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तयार करणं आयसीसीसाठी सोपं असणार नाही. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. गेल्या वर्षी 2023 च्या टी 20  वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.  दुसरीकडे आशिया कपचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारतानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळं भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.


संबंधित बातम्या :


INDW vs NEPW: टीम इंडियाचा दणदणीत विजय, नेपाळवर 82 धावांनी विजय, पाकिस्तानला सेमी फायनलची लॉटरी


Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणाच्या नावावर, टॉप 5 मध्ये 'या' देशांचा समावेश