ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नसले तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे मीडिया रिपोर्ट्सवरून स्पष्ट झाले आहे. टीम इंडियानंतर आता आयसीसीने देखील पाकिस्तानला धक्का देत स्पर्धेसाठी प्लॅन-बी तयार केला आहे.


आयसीसीने कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुमारे 70 दशलक्ष बजेट मंजूर केले आहे. या बजेटमध्ये आयसीसीने सध्या चर्चेत असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही तर काही सामने पाकिस्तानबाहेरही आयोजित केले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन आयसीसीने बजेट जाहीर केले आहे. क्रिकबझच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अशाप्रकारे आयसीसीने आपल्या प्लॅन बीसह पाकिस्तानला स्पष्टपणे 440 व्होल्टचा धक्का दिला आहे. पाकिस्तानने ड्राफ् केलेल्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्यात आले असून टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ग्रुप-1 मध्ये असणार आहे. 


टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार-


बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.


आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-


गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. 


भारत जुन्या भूमिकेवर ठाम-


भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16  वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.  


संबंधित बातमी:


आयसीसीने पाकिस्तानसाठी पेटारा उघडला; जय शाह यांच्या उपस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिला छप्परफाड पैसा!