कोलंबो : श्रीलंकेनं दुसऱ्या मॅचमध्ये भारतापुढं विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक केली होती. रोहित शर्मानं पहिल्या मॅचप्रमाणं अर्धशतक झळकावलं. मात्र, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी गडगडली. जेफरी मेंडरसेच्या गोलंदाजीपुढं भारताच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. जेफरी मेंडरसे आणि चारिथ असलंका या दोघांनी भारताला हादरे दिले. भारताचा डाव 208 धावांवर आटोपला. श्रीलंकेनं भारताला 32  धावांनी पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली. 


रोहित शर्मा बाद होताच, भारताचा डाव गडगडला


रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली होती.  रोहित शर्मानं या मॅचमध्ये देखील अर्थशतक झळकावलं. मात्र, इतर फलंदाज दमदार कामगिरी करु शकले नाहीत. जेफरी मेंडरसेनं रोहित शर्माला 64 धावांवर बाद केलं. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताच्या धावा 97 होत्या. मात्र, यानंतर जेफरी मेंडरसेनं भारताच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, के एल राहुल यांना जेफरी मेंडरसेनं बाद केलं. यामुळं 97  धावांवर एक विकेट असलेला भारताचा संघ 147 वर 6  बाद अशी स्थिती झाली. यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 38  धावांची भागिदारी केली. मात्र, श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका  यानं अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरला बाद केलं. अक्षर पटेलनं 44  धावा केल्या.वॉशिंग्टन सुंदरनं 15 धावा केल्या.   


श्रीलंकेचं भारताला विजयासाठी 241 धावांचं आव्हान


पहिल्याच ओव्हरमध्ये निसांकाच्या रुपानं धक्का मिळाल्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला.  फर्नांडोनं 40 तर कुसलं मेंडिसनं 30 धावा केल्या. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं 25  धावांवर बाद केलं. गेल्या मॅचप्रमाणं  यावेळी देखील दुनिथ वेल्लालगे आणि कमिंडू मेंडिस यांनी मैदानावर तळ ठोकत श्रीलंकेच्या संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. श्रीलंकेनं अखेर 50 ओव्हरमध्ये 9 बाद 240  धावा केल्या. दुनिथ वेल्लालगेनं 39 आणि कमिंडू मेंडिसनं 40  धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर यानं तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादवनं 2, मोहम्मद सिराजनं एक आणि अक्षर पटेलनं 1 विकेट घेतली. श्रीलंकेचे दोन फलंदाज धावबाद झाले.  


भारताला तिसऱ्या मॅचमध्ये विजयाची गरज


श्रीलंकेनं पहिल्या मॅचमध्ये भारताला विजयापासून रोखत मॅच ड्रॉ राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या मॅचमध्ये भारताला पराभवाचा धक्का देत श्रीलंकेनं मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली. यामुळं भारताला मालिकेत बरोबरी करणं गरजेचं झालेलं आहे. भारताला काहीही करुन तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या :


रोहित शर्मा बाद होताच भारताची फलंदाजी गडगडली, वेंडरसेनं सुरुंग लावला, विराट ते राहुल सगळे फेल

 

आता तुला मारेनच, रोहित शर्माचा वारंवार एकच चूक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला इशारा, पाहा व्हिडीओ