Champions Trophy 2025 Final : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. मात्र,दुबईतील एकाच मैदानावर भारताचे सर्व सामने खेळवण्यात येत असल्याने  टीम इंडियाला याचा फायदा होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय.  उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही भारतामुळे कराव्या लागलेल्या प्रवासावर खापर फोडलंय. इंग्लंडचे तज्ज्ञही असेच म्हणताना दिसले आणि आता न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनीही या समस्येबद्दल बोलले आहेत. गॅरी स्टेड म्हणाले की आमची टीम लाहोरहून दुबईला आली आहे आणि आमचा संपूर्ण दिवस प्रवासात गेला, यामुळे त्रास झाला.


वरुण चक्रवर्तीचे आमच्यासमोर  सर्वात मोठे आव्हान असेल - गॅरी स्टेड 


गॅरी स्टेड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारताविरुद्ध रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये वरुण चक्रवर्तीचे आमच्यासमोर  सर्वात मोठे आव्हान असेल. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीला सामोरे जाण्यासाठी आमच्या संघाला नवीन रणनिती आखावी लागेल. वरूणने आमच्याविरुद्धच्या गेल्या सामन्यात 42 धावांत पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे तो या सामन्यातही खेळेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. तो एक चांगला फिरकीपटू असून त्याने गेल्या सामन्यात आपले कौशल्य दाखवून दिले. तो आमच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. आम्हाला वरुण चक्रवर्तीला कसे फेस करायचे आणि  त्याच्याविरुद्ध धावा कशा करायच्या यावर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. भारताविरुद्धच्या साखळी टप्प्यातील सामन्यातून आम्ही काहीतरी शिकू आणि त्याआधारे आमची रणनीती बनवू.


पुढे बोलताना गॅरी स्टेड म्हणाले, टूर्नामेंटचे वेळापत्रक बनवणे आमच्या हातात नाही, त्यामुळे आम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. भारताने आपले सर्व सामने दुबईत खेळले आहेत, पण आम्हाला येथेही सामना खेळण्याची संधी मिळाली. त्या अनुभवातून आम्हाला शिकायला आवडेल. सुरुवातीला आठ संघ होते, आता फक्त दोनच राहिले आहेत. ही एक मोठी संधी आहे आणि आम्ही ती सामान्य सामन्याप्रमाणे हाताळत आहोत. रविवारी जर आम्ही चांगली कामगिरी करू शकलो आणि भारताला पराभूत करू शकलो तर मला खूप आनंद होईल, असंही गॅरी स्टेड यांनी नमूद केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


IND vs NZ Final : 'सामना संपल्यानंतरच समजेल...' चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? उपकर्णधार गिलने केला खुलासा