(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN 2022: भारतीय फॅन्ससाठी आनंदाची बातमी! फिटनेस टेस्ट पास करत कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा संघात दाखल
Team India : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. पण पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे रोहित शर्मा खेळू शकला नसून दुसऱ्या कसोटीत तो खेळेल असे दिसून येत आहे.
Rohit Sharma Fitness Test : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जो अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत (India vs Bangladesh 1st Test) संघात नव्हता, तो आता दुखापतीतून सावरला आहे.त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 2nd Test) तो संघाचा भाग असेल, अशी माहिती समोर येत आहे. रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेतील (Rohit Sharma Injury) दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली, ज्यामुळे तो बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह पहिल्या कसोटी सामन्यात संघात नव्हता. पण आता दुसऱ्या कसोटीत तो नक्कीच संघात असू शकतो भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.
रोहित शर्मा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) फिटनेस चाचणी पास झाल्यानंतर आता बांगलादेशमध्ये संघासोहच सामील होण्यास सज्ज झाला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रोहित शर्मासोबत फिजिओ देखील उपस्थित होता. यापूर्वी रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. श्रीलंका मालिकेनंतर तो कसोटी सामन्यात खेळलेला नाही. त्याचवेळी, या वर्षी जुलैमध्ये, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही तो संघाचा भाग नव्हता. त्यावेळी रोहितला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा कसोटी सामना खेळत रोहित कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.
कसोटी मालिकेत भारताची आघाडी
भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.
हे देखील वाचा-