Union Budget 2021: आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडला. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने 'आर्थिक लस' देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर मिळवलेल्या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन करत आपल्या अर्थसंकल्पीय  भाषणाची सुरुवात केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या ओळीचा उल्लेख यावेळी केला. “विश्‍वास हा असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधारात प्रकाशाचा मार्ग दाखवतो.” असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. या ओळीचा संदर्भ देत भारताची अर्थव्यवस्था अशाच प्रकारे झेप घेईल असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.  भारत सध्या नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहे, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विकास साध्य करु, अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी आपल्या भाषणात केले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेमध्ये मिळवलेला विजय हा भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. याचप्रमाणे निर्मला यांनी करोनाच्या लढ्यामध्ये भारतीयांनी जी जिद्द दाखवली त्यासाठी मी त्यांना सलाम करते असंही म्हटलं.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अभिनंदनामुळे निश्चितच भारतीय संघाचे मनोबल वाढवणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचा विजय प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. अर्थसंकल्पापूर्वी 'मन की बात या कार्यक्रमात त्यांनी भारतीय संघाने पिछाडीवर राहुन पुढे जाऊ शकतो हे दाखवून दिल्याचा उल्लेख केला होता.

संबंधित बातम्या