India vs Australia 3rd Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंवर तो सतत त्याची विकेट गमावत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाची चिंता सतत वाढत आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटीच्या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात विराट अशाच पद्धतीने आऊट झाला. जोश हेझलबडच्या ऑफ स्टंप बॉलच्या बॉलवर कव्हर ड्राईव्ह मारताना तो आऊट झाला, यादरम्यान, 16 चेंडूत 3 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज सतत कोहलीला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना आपली शिकार बनवत आहेत. गावसकर यांनी यावर आपले मत व्यक्त केले आणि 2004 मध्ये सिडनी कसोटीदरम्यान सचिनने कव्हर ड्राईव्ह न खेळण्याचा निर्णय कसा घेतला होता ते पाहण्याचा सल्ला कोहलीला दिला. यामुळे कोहलीला अशाच अडचणींवर मात करण्यास मदत होईल.
तेंडुलकरची खेळी पाहण्याचा दिला सल्ला
गावसकर म्हणाले, होय, मला वाटते सराव वेगळा आहे आणि मानसिकताही पूर्णपणे वेगळी आहे. सरावात तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही खराब शॉट खेळत असाल तर तुम्ही खेळता, पण मॅचमध्ये जर तुम्ही आऊट झालात तर तुम्हाला पॅव्हेलियनमध्ये जावे लागेल. माझ्या मते कोहलीने 2004 मध्ये खेळलेली सचिनची खेळी पाहावी. पहिल्या तीन सामन्यांमध्ये तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळून बाद होत होता. स्लिप किंवा गल्लीत तो झेलबाद होत होता. सचिन जेव्हा सिडनीला खेळायला आला तेव्हा त्याने कव्हर एरियात येणारा चेंडू खेळायचा नाही असे ठरवले. त्या सामन्यात त्याने कव्हर ड्राईव्ह मारले नाही आणि मला वाटते की आपण आपल्या मनावर अशा प्रकारचे नियंत्रण ठेवले पाहिजे.
2003-04 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या सिडनी कसोटीदरम्यान सचिनने मानसिक नियंत्रणाचे एक उदाहरण सादर केले. खराब फॉर्मच्या दडपणातही तो संघर्षावर मात करू शकला. त्यावेळी सचिन सतत कव्हर ड्राईव्ह खेळून आऊट होत होता. हा शॉट त्याचा आवडता होता, पण त्यावेळी तो त्याच्यासाठी ओझे बनला होता. ब्रेट ली, आंद्रे बिचेल आणि जेसन गिलेस्पी यांसारख्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सचिनला ऑफ-साइड चेंडू टाकण्याची योजना आखली होती, जेणेकरून सचिनकडून काही चुका होतील. सचिनला मात्र हे समजले आणि त्याने संपूर्ण डावात कव्हर ड्राइव्ह न खेळण्याचा निर्णय घेतला.
कोहली पुनरागमन करणार गावसकरांना विश्वास
कोहलीने ऑस्ट्रेलियन दौऱ्याची सुरुवात पर्थमध्ये दुसऱ्या डावात शतक ठोकून केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. मात्र, यानंतर पुढील तीन डावांत त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. गावसकर यांनी मात्र या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी कोहलीला अजूनही वेळ आहे, असा विश्वास व्यक्त केला. गावसकर म्हणाले, कोहलीने हे आधीच सिद्ध केले आहे. मानसिक नियंत्रणाशिवाय तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा आणि 32 शतके करू शकत नाही. गाबा कसोटीबद्दल बोलायचे झाले तर दुसरा डाव अजून बाकी असून आणखी दोन कसोटी सामने होणार आहेत. कोहलीला अजूनही या समस्येवर मात करण्याची संधी आहे.