Rajeev Shukla On IPL 2024 Venue : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. काही दिवसांनंतर आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा परदेशात होणार का? याबाबत क्रीडा चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएलचं आयजोन भारतातच झालं होतं. पण 2009 आणि 2014 आयपीएल स्पर्धा परदेशात झाली आहे. आयपीएल 2014 चं आयोजन दुबईमध्ये करण्यात आले होते तर 2009 आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकामध्ये पार पडली होती. पण यंदा काय होणार? यंदाची आयपीएल स्पर्धा परदेशात होणार का? या प्रश्नांचं उत्तर बीसीसीआय उपाध्याक्ष राजीव शुक्ला यांनी दिले आहे.
' आधी सरकारसोबत चर्चा करणार, त्यानंतरच निर्णय घेणार'
बीसीसीआय उपाध्याक्ष राजीव शुक्ला यांनी यांनी Insidesport सोबत बोलताना आयपीएल 2024 बद्दल मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले की, आयपीएल 2024 स्पर्धा भारतात होणार की परदेशात, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत आम्ही आधी केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहे, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. आयपीएल स्पर्धेबाबत आमचं केंद्र सरकारसोबत बोलणी सुरु आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही? याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय ठरवेल.
महिला प्रिमियर लीगच्या ठिकाणाबद्दल काय म्हणाले राजीव शुक्ला?
बीसीसीआय उपाध्याक्ष राजीव शुक्ला यांनी महिला प्रिमियर लीगच्या ठिकाणाबद्दलही आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले की, "महिला प्रिमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातील सामने बेंगलोर आणि दिल्लीमध्ये होतील. " म्हणजेच, महिला प्रिमियर लीग फक्त दोन ठिकाणी होणार आहे. राजीव शुक्ला म्हणाले की, महिला प्रीमियर लीगची तयारी सुरू झाली आहे. WPL चे अर्धे सामने बेंगलोरमध्ये आणि अर्धे सामने दिल्लीत होतील. दरम्यान, आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु होऊ शकतो. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयपीएल भारतात की परदेशात होणार? याबाबत केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ठरेल.
22 मार्चपासून सुरु होणार आयपीएलचा 17 वा हंगाम
आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएलला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होईल. या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुक देखील आहे. आयपीएल आणि निवडणुकांमध्ये अंतर ठेवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर आयपीएलला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणुक झाली तेव्हा आयपीएलचे सामने भारतामध्येच झाले होते.