19 Asia Cup 2025 Team India : भारतीय अंडर-19 संघाला आशिया कपच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सखोल समीक्षा करणार आहे. हा निर्णय 22 डिसेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. अंतिम फेरीत भारताला पाकिस्तानकडून 191 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामागची कारणे शोधण्यासाठी बीसीसीआय संपूर्ण कामगिरीचा आढावा घेणार आहे.
अंतिम सामन्यातील पराभवाची कारणे शोधणार बीसीसीआय....
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, जेव्हा विजेतेपद जिंकणे सर्वाधिक महत्त्वाचे होते, तेव्हाच संघाची कामगिरी पूर्णपणे कोलमडली. गोलंदाजी प्रभावहीन ठरली, तर फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे बीसीसीआय केवळ समीक्षा करणार नाही, तर टीम मॅनेजमेंटकडून पराभवाबाबत सविस्तर स्पष्टीकरणही मागणार आहे.
कोच आणि कर्णधाराशी होणार चर्चा
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय अंडर-19 संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याशी अंतिम सामन्यातील कामगिरीवर थेट चर्चा करणार आहे. ही चर्चा टीम परफॉर्मन्स रिव्ह्यूचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेच्या वर्तणुकीवर कारवाई?
अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या वर्तणुकीबाबतही बीसीसीआयने चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता असून, त्यावर काही पावले उचलली जाऊ शकतात. मात्र, हा मुद्दा अधिकृतपणे रिव्ह्यू प्लॅनचा भाग आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
वर्ल्ड कपपूर्वीच होणार रिव्ह्यू
भारतीय अंडर-19 संघाला लवकरच झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. त्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा अद्याप व्हायची आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वीच आशिया कपमधील पराभवाचा आढावा पूर्ण करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे, जेणेकरून भविष्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागू नये.
अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा 191 धावांनी पराभव- (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)
अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला.
पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने तिसऱ्याच षटकांत 32 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे सात चेंडूत दोन धावा करून बाद झाला.त्यानंतर आरोन जॉर्ज नऊ चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापाठोपाठ वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाने सातत्यपूर्ण फलंदाजी केली नाही. जलद धावांचा पाठलाग करताना सर्व बाद झाले. वेदांत त्रिवेदी 14 चेंडूत 9, अभिज्ञान कुंडू 20 चेंडूत 13, कनिष्क चौहान 23 चेंडूत 9 आणि खिलन पटेल 23 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेनिल पटेलनंतर दीपेश देवेंद्रनने 36 धावा केल्या.
हे ही वाचा -